संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था आणि श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु राष्ट्र’ हे मागासवर्गीय विरोधी असून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू केली जाणार, हा मिथ्यारोप !
वास्तव : काही राजकीय पक्षांनी ‘देशात ‘हिंदु राष्ट्र’ आल्यास ते मागासवर्गीय विरोधी असून त्यामुळे देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू केली जाणार आहे’, असा खोटा प्रचार चालू केला आहे. संविधानातील कोणतीही सुधारणा संसदेत मान्य व्हावी लागते. अयोग्य सुधारणेविषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका करता येते. त्यामुळे कोणतीही सुधारणा सद्यस्थितीत होणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या मूळ संकल्पनेतच धर्म कोणाचेही शोषण करणारा नसून तो सर्व प्राणिमात्रांच्या हितासाठीच कार्यरत असण्याचा उल्लेख आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘मला अभिमान आहे की, मी अशा एका संस्कृतीतून आलो आहे, जेथील संस्कृत भाषेत ‘बहिष्कार’ शब्दासाठी कोणताही पर्यायी किंवा समानार्थी शब्द नाही.’ संत तुलसीदास म्हणतात, ‘परहित सरिस धरम नही भाई । पर पीडा सम नही अधमाई ॥’ अर्थात ‘दुसर्याला दुःख देणे, सर्वांत मोठा अधर्म, तर दुसर्याला सुख देण्यासारखा मोठा धर्म नाही.’ हिंदु धर्मात जन्माधारित वर्णव्यवस्था नसून गुण-कर्माधारित असल्याचे भगवंताने गीतेत सांगितले आहे. यजुर्वेदात म्हटले आहे, ‘‘हे भगवंता, आम्हा ब्राह्मणांत, क्षत्रियांत, वैश्यांत, तसेच शूद्रांमध्ये ज्ञानाची ज्योत प्रदान करा. मलाही सत्याचे दर्शन होण्यासाठी ती ज्ञानज्योत प्रदान करा.’’ स्वामी विवेकानंद ‘माझा भारत, अमर भारत’ या ग्रंथात म्हणतात, ‘भारतातील सर्व समाजसुधारकांकडून झालेली मोठी चूक म्हणजे त्यांनी काही स्वार्थी धर्ममार्तंडांच्या अयोग्य कृतीसाठी धर्मालाच उत्तरदायी ठरवले आणि धर्मालाच नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला. जातीभेदाला धर्माचे अंग मानून जातीभेदासह धर्मच नष्ट करण्याचा प्रयत्न राजाराम मोहन रायसारख्यांनी केला.’ यावरून हिंदु धर्मात कोणावरही अन्याय करण्याचे समर्थन नाही. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’त समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय करण्याचा विचारही नाही.
‘हिंदु राष्ट्रवादा’च्या तुलनेत ‘विकासवादी राष्ट्रवादा’ला श्रेष्ठ समजणे, हा भ्रम !
वास्तव : आजकाल ‘विकासवादी राष्ट्रवाद’ श्रेष्ठ समजले जात आहे. तसेच निवडणुकांमध्येही ‘विकासवादी राष्ट्रवादा’साठी मत देण्याचे आवाहन केले जात आहे. विकासवादी राष्ट्रवादामुळे रस्ते बनतील, ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘मेट्रो’ इत्यादी मिळेल; पण या विकासानंतर ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘मेट्रो’ यांमध्ये बलात्कार, विनयभंग घडणार असतील, तर तो विकास आम्हाला हवा आहे का ? सीतेचे अपहरण करणारी रावणाची सोन्याची ‘लंका’ही आजची ‘स्मार्ट सिटी’ होती. आम्हाला तशी ‘स्मार्ट सिटी’ हवी आहे का ? धर्म ही अशी गोष्ट आहे की, जी काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपूंवर विजय मिळवण्यास शिकवते. त्यामुळे धर्मासह विकास नैतिक असतो, तर धर्माविना म्हणजेच अधर्मी विकास अनैतिक ठरतो. धर्म पर्यावरणपूरक असतो, म्हणून धर्माविना विकास पर्यावरणाचा विध्वंस करतो. आजकाल प्राचीन मंदिरे पाडून विकास केला जात आहे. आम्हाला मूर्तीभंजक गझनीचा विकास नको, तर मंदिर आणि तीथर्र्क्षेत्रे यांचे संवर्धन करणार्या अहल्याबाई होळकर यांचा विकास हवा आहे; कारण या विकासात धर्म आहे, म्हणून नैतिकता आहे. त्यामुळे त्यात पर्यावरण संरक्षण आहे आणि भ्रष्टाचारही नाही ! धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे तो आनंददायी नाही. ज्या दिवशी तो ‘विकासवादी हिंदु राष्ट्रवाद’ होईल, त्या दिवशी भारतीय मन विकासामुळे आनंदित होईल आणि खरोखरंच भारताला ‘अच्छे दिन’ येतील.