श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी हे एका रुग्णालयात गेल्या ८ वर्षांपासून गर्भवैज्ञानिक म्हणून नोकरी करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी एका खासगी वंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी केली होती. तेथे ‘प्रयोगशाळा हाताळणे आणि वंध्यत्वावरील उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना त्या संदर्भात समुदेशन करणे’, असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. नोकरी करतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले काही अपप्रकार पुढे दिले आहेत.
१. प्रसंग १
१ अ. वंध्यत्व उपचारासाठी केंद्रात आलेल्या दांपत्यातील पतीचे वीर्य पुरेशा गुणवत्तेचे नसल्याचे लक्षात येणे, आधुनिक वैद्यांनी अन्य वीर्यदात्याचे वीर्य वापरून ‘टेस्ट ट्यूब’द्वारे गर्भधारणा करण्याचा समादेश दिल्यावर पतीने तो नाकारणे, गर्भधारणा करण्याची प्रक्रिया केल्यावर ती विफल ठरणे : ‘विवाहानंतर एकदाही गर्भधारणा झाली नसल्याची समस्या असलेले हुबळ्ळी येथील एक दांपत्य वंध्यत्व उपचारासाठी केंद्रात आले होते. त्यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर पतीचे वीर्य पुरेशा गुणवत्तेचे नसल्याचे लक्षात आले. त्यांनी वंध्यत्व निवारण केंद्राचे संचालक तथा वरिष्ठ गर्भवैज्ञानिक आधुनिक वैद्यांची भेट घेतली. त्या वेळी अन्य वीर्यदात्याचे वीर्य वापरून ‘आय्.व्ही.एफ्.’, म्हणजे ‘टेस्ट ट्यूब’द्वारे गर्भधारणा करण्याचा समादेश त्या वैद्यांनी त्यांना दिला. पतीनेे हा समादेश नाकारून ‘काहीही परिणाम झाले, तरी गर्भधारणेसाठी स्वतःचेच वीर्य वापरण्यात यावे’, असा आग्रह धरला. त्यानुसार त्यांची ‘आय्.व्ही.एफ्.’, म्हणजे ‘टेस्ट ट्यूब’द्वारे गर्भधारणा करण्याची प्रक्रिया करण्यात आली; परंतु ही प्रक्रिया विफल ठरली.
१ आ. पतीचे वीर्य आणि दात्याचे वीर्य समप्रमाणात उपयोगात आणून प्रक्रिया करण्याचा समादेश देण्यात येणे अन् पतीने हा समादेश पुन्हा नाकारणे : काही मासांनंतर ते दांपत्य पुन्हा एकदा ‘टेस्ट ट्यूब’द्वारे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने उपचारासाठी केंद्रात आले. या वेळी केंद्राचे संचालक तथा वरिष्ठ गर्भवैज्ञानिक आधुनिक वैद्य यांनी पतीचे वीर्य आणि दात्याचे वीर्य समप्रमाणात उपयोगात आणून प्रक्रिया करण्याचा त्यांना समादेश दिला. पतीने हा समादेश तीव्र आक्षेपासह पुन्हा नाकारला आणि ‘स्वतःचेच वीर्य वापरण्यात यावे’, असे स्पष्टपणे सांगितले.
१ इ. ‘आय्.व्ही.एफ्.’ गर्भधारणेच्या प्रक्रियेच्या आरंभीच पतीच्या वीर्याच्या नमुन्याची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे लक्षात येणे, हा प्रयोग यशस्वी ठरवण्यासाठी केंद्राच्या वरिष्ठ गर्भवैज्ञानिक आधुनिक वैद्याने अन्य दात्याचे वीर्य वापरण्याची सूचना देणे : ‘आय्.व्ही.एफ्.’ गर्भधारणेच्या प्रक्रियेच्या आरंभीच पतीच्या वीर्याच्या नमुन्याची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यास वीर्याचा हा नमुना अपात्र ठरत होता; मात्र हा प्रयोग यशस्वी ठरवण्यासाठी केंद्राच्या वरिष्ठ गर्भवैज्ञानिक आधुनिक वैद्याने एखाद्या अन्य दात्याचे वीर्य वापरण्याची सूचना केली. असे करतांना संबंधित दांपत्याला या प्रक्रियेची पूर्ण कल्पना देऊन त्यांची त्यासाठी नियमानुसार लेखी संमती घेेणे बंधनकारक असते. या मार्गदर्शक नियमांचे पालन करणे टाळून ते तज्ञ म्हणाले, ‘‘गर्भधारणा यशस्वी झाली, तर नंतर ‘पुढे काय करायचे ?’, ते आपण पाहू.’’
१ ई. ‘या नियमबाह्य प्रकारातून कायदेशीरदृष्ट्या अपराधमुक्त रहाता यावे’, यासाठी दांपत्याकडून क्लृप्तीने संमतीपत्र लिहून घेण्यात येणे : त्यानंतर पंधरा दिवसांनी या प्रक्रियेच्या संदर्भातील वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ‘स्त्रीबीज फलित होऊन प्रक्रिया यशस्वी झाली आहे’, असा चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. केंद्राच्या वरिष्ठ गर्भवैज्ञानिक आधुनिक वैद्याने हा अहवाल पाहिला. ‘या नियमबाह्य प्रकारातून भविष्यात कायदेशीरदृष्ट्या अपराधमुक्त रहाता यावे’, यासाठी त्याने दांपत्याकडून क्लृप्तीने संमतीपत्र लिहून घेतले.
१ उ. कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठीच हे संमतीपत्र फसवून मिळवलेेले असल्याने पालकांना ‘मुलात ५० टक्के आईची अन् ५० टक्के दात्याची जनुके (जीन्स) आहेत’, हे सत्य स्वीकारल्याविना काहीच पर्याय उरणार नसणे : भविष्यात अपत्याच्या जन्मानंतर याविषयी शंका आल्यास अथवा वैद्यकीय जनुक चाचणीद्वारे ही भिन्नता उघडकीस आल्यास त्याच्या आधारे जन्मदात्याच्या संदर्भात उपचार केंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो; मात्र असा प्रश्न उभा राहिलाच, तर त्या मुलाचे पालकत्व दांपत्याला नाकारता आले नसते अथवा केंद्राला गुन्ह्यात गोवता आले नसते; कारण तसे कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठीच हे संमतीपत्र फसवून मिळवलेेले होते. त्यामुळे पालकांना आता त्या मुलाचे पालकत्व आणि ‘मुलात ५० टक्के आईची अन् ५० टक्के दात्याची जनुके (जीन्स) आहेत’, हे सत्य स्वीकारल्याविना काहीच पर्याय उरणार नाही.
‘वंध्यत्व उपचाराची प्रक्रिया यशस्वी ठरावी’, यासाठी केंद्राचे संचालक असा अपप्रकार करत असतात. असे करणे हे वैद्यकीय नीतीमूल्यांच्या दृष्टीने अनैतिक आहे, तसेच रुग्णाच्या भावनेशी खेळण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे.
२. प्रसंग २
२ अ. ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रियेअंतर्गत मुंबई येथील एका हिंदु जोडप्यातील स्त्रीकडून काही अतिरिक्त बीजांडे प्रक्रियेसाठी उपलब्ध होणे : मुंबई येथील एक हिंदु जोडपे ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या प्रक्रियेसाठी वंध्यत्व निवारण केंद्रात आले होते. रुग्णाच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर ‘पतीचे वीर्य स्त्रीबीज फलित करू शकत नाही’, असे आढळले. त्या जोडप्याला तशी कल्पना दिल्यानंतर त्यांनी दात्याचे वीर्य वापरून ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रिया करण्यास संमती दिली. ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रियेअंतर्गत या हिंदु जोडप्यातील स्त्रीकडून काही अतिरिक्त बीजांडे प्रक्रियेसाठी उपलब्ध झाली.
२ आ. त्याच दिवशी बेळगाव येथील एका ख्रिस्ती जोडप्यातील स्त्रीसाठी स्त्री बीजांडे उपलब्ध करणे आवश्यक असणे आणि कोणतीही कल्पना न देता हिंदु स्त्रीची अतिरिक्त बीजांडे ख्रिस्ती जोडप्यासाठी वापरण्यात येणे : त्याच दिवशी कर्नाटकमधील बेळगाव येथील एक ख्रिस्ती जोडपे वंध्यत्व निवारण केंद्रात उपचारासाठी आले होते. या ख्रिस्ती स्त्रीसाठी स्त्री बीजांडे उपलब्ध करणे आवश्यक होते. हिंदु स्त्रीची ही अतिरिक्त बीजांडे त्या ख्रिस्ती जोडप्यासाठी वापरण्यात आली. वैद्यकीय नैतिक मूल्यानुसार असे करतांना दात्याची संमती घेणे आवश्यक आहे; मात्र त्यांची त्यासाठी संमती घेतली नाही अथवा त्यांना तशी कल्पनाही दिली नाही. पंधरा दिवसांनंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत दोन्ही जोडप्यांच्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रिया यशस्वी झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. वास्तविक आता मुंबईच्या महिलेची दोन मुले असतील. त्यांतील एक स्वतःकडे असेल आणि दुसरे त्या ख्रिस्ती जोडप्याकडे असेल.
‘प्रक्रिया यशस्वी करणे आणि अल्पावधीत पुष्कळ पैसा अन् प्रसिद्धी मिळवणे’, यांसाठी वैद्यकीय नैतिक मूल्यांचे उल्लंघन करून आधुनिक वैद्य असा अपप्रकार करतात.’ (क्रमशः)
– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, कर्नाटक. (जानेवारी २०१९)
आरोग्य साहाय्य समितीची वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी मोहीम !
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आम्हाला कळवा.
चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !
पैसे लुबाडणार्या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता
सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]