Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त कर्नाटक राज्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

मंगळूरू आणि केरूर येथे हिंदू एकता दिंडी, तर विजयनगर येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा

  • मंगळूरू (कर्नाटक) येथे चैतन्यदायी वातावरणात हिंदू एकता दिंडी

  • सनातनचे संत पू. रमानंद गौडा, पू. विनायक कर्वेमामा, पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी आणि बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची वंदनीय उपस्थिती

दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी साधक आणि धर्मप्रेमी

मंगळूरू (कर्नाटक) : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळूरू येथे चैतन्यदायी वातावरणात नुकतीच हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. मंगळूरूच्या ज्योती सर्कल येथे धर्मध्वजाचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला आणि टाऊन हॉलमध्ये दिंडीचे सभेमध्ये रूपांतर झाले. या दिंडीमध्ये भजनी मंडळे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘हिंदूसंघटन’ यांविषयी घोषणा दिल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. सनातनच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्राला फुले वाहिली. सनातनचे संत पू. रमानंद गौडा, पू. विनायक कर्वेमामा आणि बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचीही या दिंडीमध्ये वंदनीय उपस्थिती होती.

हिंदु राष्ट्राची मागणी हा हिंदूंचा घटनात्मक अधिकार आहे ! – चंद्र मोगेर, जिल्हा समन्वयक, दक्षिण कन्नड, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्मक अधिकार आहे. देशाच्या मूळ राज्यघटनेमध्ये ‘सेक्युलर’ हा शब्द नव्हता. वर्ष १९७६ मध्ये ४७ व्या घटनादुरुस्तीद्वारे तो घटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आला. घटनादुरुस्तीद्वारे हा देश ‘सेक्युलर’ होऊ शकतो, तर मग आणखी एका घटनादुरुस्तीद्वारे हा देश ‘हिंदु राष्ट्र’ का होऊ शकत नाही ?’

मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे गौरवशाली हिंदु परंपरा लोप पावली ! – अधिवक्ता चंद्रशेखर राव

‘एकेकाळी भारत विश्‍वगुरु होता. भारतात ‘ग्राम, गुरुकुल आणि गाय’ ही आदर्श जीवनपद्धती अवलंबली जायची. त्यामुळे प्रत्येक गाव स्वावलंबी होते. गावामध्ये विद्या आणि कला यांचे शिक्षण देणारे गुरुकुल होते. गायीला गोमाता असे संबोधले जायचे. प्रत्येकाच्या घरी गाय होती. मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे देशातील ही गौरवशाली हिंदु परंपरा लोप पावली.

साधकांच्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवला ‘गुरुकृपायोग’! – सौ. लक्ष्मी पै

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना शिकवली. हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण करण्याच्या उद्देशाने त्यांनी सनातन प्रभात नियतकालिक चालू केले.

क्षणचित्रे

  • दिंडीमध्ये रणरागिणी शाखेच्या महिलांनी राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा आणि इतर महिला स्वातंत्र्यसेनानी यांची वेशभूषा केली होती, तसेच युवकांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके करून दाखवली.
  • सनातनचे बालसंत पू. भार्गवराम यांनी दिंडीमध्ये भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती, तसेच हातात भगवा ध्वज घेऊन घोषणा दिल्या.

शहर पोलीस उपायुक्तांकडून हिंदू एकता दिंडीचे कौतुक !

हिंदू एकता दिंडी आदर्श पद्धतीने काढण्यात आली. त्यामुळे दिंडीसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना अजिबात थकवा जाणवला नाही, असे शहर पोलीस उपायुक्त म्हणाले.

केरूर (कर्नाटक) येथे हिंदू एकता दिंडीमध्ये साधक आणि धर्माभिमानी यांचा उत्स्फूर्त सहभाग

पालखीत ठेवलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे भावपूर्ण पूजन करतांना साधिका

बागलकोट (कर्नाटक) : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त नुकतीच केरूर येथे चैतन्यमय आणि भावपूर्ण  वातावरणात हिंदू एकता दिंडी पार पडली. या दिंडीमध्ये ३२० हून अधिक साधक आणि धर्माभिमानी सहभागी झाले.

श्री बनाशंकारी मंदिरात धर्मध्वज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली आणि श्री बनाशंकारी मंदिरामध्ये समारोप करण्यात आला. या दिंडीमध्ये धर्मध्वज, परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी, परात्पर गुरुदेवांची सुवचने असणारे फलक हातात घेऊन धर्मप्रेमी सहभागी झाले.

क्षणचित्रे

१. या दिंडीमध्ये भजनी मंडळ, तसेच ७५ सुवासिनी पूर्ण कुंभ घेऊन सहभागी झाल्या.

२. लहान मुले राष्ट्रपुरुषांची वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाली.

३. दिंडीच्या प्रारंभीपासून शेवटपर्यंत धर्माभिमान्यांनी दिंडीतील सहभागी साधक आणि धर्माभिमानी यांना खाऊ अन् पाणी यांचे वाटप करण्याची सेवा केली.

४. दिंडीतील भजन मंडळाने भावपूर्ण भजने म्हटली. ‘दिंडीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भावचित्र पाहून अतिशय भावजागृती होत होती’, असे त्यांनी सांगितले.

लोकांचे शोषण करणार्‍या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्याविषयी मार्गदर्शन

बेंगळूरू येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा

कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना श्री. भास्करन् आणि अन्य मान्यवर

बेंगळूरू (कर्नाटक) : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सवानिमित्त विजयनगर येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला माहिती अधिकार क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. भास्करन् आणि श्री. वीरेश व्ही.एच्. यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकांचे शोषण करणार्‍या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात वैध मार्गाने लढा देणे, तसेच रामराज्याची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रभु श्रीरामाचा आदर्श अंगिकारणे आदींविषयी या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी माहिती अधिकार कायद्याचा वापर, त्याचे विविध परिणाम, माहिती अधिकाराविषयी मसुदे सिद्ध करणे इत्यादी विषयांवर सखोल माहिती देण्यात आली. ‘प्रशासनातील भ्रष्टाचार अन् अनैतिक पद्धत यांच्या विरोधात लढा देणे आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणे यांसाठीच माहिती अधिकार कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे’, असे श्री. भास्करन् यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्याचा न्याय्य वापर करण्यावरही त्यांनी या वेळी भर दिला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *