साधनेद्वारे आत्मबळ वाढवून हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध व्हा ! – आनंद जाखोटिया
सागर (मध्यप्रदेश) : धर्मरक्षणासाठी अनेक महापुरुषांनी कार्य केले; पण ज्यांनी या कार्याला साधना आणि गुरूंचे मार्गदर्शन यांची जोड दिली, त्यांच्याकडून असाधारण कार्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांसारखी अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. आज धर्माला ग्लानी आलेली असतांना आपल्यालाही धर्माचरण, उपासना आणि संतांचे मार्गदर्शन घेऊन कार्य करायला हवे. साधनेद्वारे आत्मबळ वाढवून आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनीही उपस्थितांना साधना आणि धर्माचरण याविषयी मार्गदर्शन केले.
ते हिंदु युवा वाहिनीचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिमन्यूसिंह बुंदेला यांनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. येथील पहलवान बब्बा हनुमान मंदिरात आयोजित या बैठकीला धर्मजागरण समन्वय विभागाचे जिल्हा विधी प्रमुख अधिवक्ता श्री. विकास सेन, श्री. अमित उपाध्याय, हिंदु युवा वाहिनीचे पंडित प्रशांत उपाध्याय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री. सुशांक भोजक, श्री. बघेले आदी उपस्थित होते.
क्षणचित्र : या वेळी सर्वांनी सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांविषयक ग्रंथ घेतले.
हिंदुत्वाच्या क्षेत्रात साहित्य निर्मितीचे सनातन संस्थेचे कार्य मोलाचे !
या वेळी अभाविपचे श्री. सुशांक भोजक आणि श्री. बघेले म्हणाले, ‘‘कम्युनिस्टांनी त्यांचे विचार पसरवण्यासाठी साहित्याचा पुष्कळ उपयोग केला. दुर्दैवाने हिंदुत्वाच्या क्षेत्रात आजच्या काळाला अनुसरून, कुतर्कांना उत्तर देणारे साहित्य अभावानेच सापडते. सनातन संस्थेनेे हे ग्रंथ निर्माण करून मोलाचे कार्य केले आहे.’’
हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना या त्रिसूत्रींद्वारे हिंदु संघटनांना धर्मबळ देण्यासाठी प्रयत्नरत ! – आनंद जाखोटिया
सागर (मध्यप्रदेश) : हिंदुत्वासाठी कार्य करत असतांना कार्यकर्त्यांना धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना या त्रिसूत्रींशी जोडले, तर संघटना अधिक मजबूत होते अन् धर्म उत्थानासाठी अधिक प्रभावी कार्य करता येऊ शकते. हिंदु जनजागृती समिती या त्रिसूत्रींद्वारे हिंदु संघटनांना धर्मबळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. याप्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी उपस्थितांना साधनेविषयी माहिती दिली. या प्रसंगी सर्वश्री जय महाकाल हिंदु संघटनेचे अध्यक्ष शिवम चौरसिया, प्रशांत साहू, शुभम शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.
येथील श्रीचंपाबाग मंदिरात ‘जय महाकाल हिंदु संघटने’च्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी काळात कार्यकर्त्यांना धर्मशिक्षणासह धर्मजागृतीचे कार्य करण्याचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाचे कार्य करण्यापासून हिंदूंकडूनच कशा प्रकारे आडकाठी आणली जात आहे आणि प्रशासनाकडून त्यांचा कसा छळ होतो, यांविषयी त्यांचे अनुभव सांगितले. (हिंदूंनी कधी नव्हे एवढी संघटित होण्याची वेळ आलेली असतांना स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी हिंदूंच्या संघटन कार्यात अडथळे आणणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत ! – संपादक)
भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्न वागणूक ! – अभय वर्तक, सनातन संस्था
बरायठा (सागर, मध्यप्रदेश) : आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंसमोर लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण अशा विविध समस्या आ वासून उभ्या आहेत. प्रत्येक समस्येचे मुळापासून निराकरण करायचे असल्यास हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. ते येथे युवकांच्या बैठकीला संबोधित करत होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत सागर जिल्ह्यातील बरायठा येथे कथावाचक श्री. मधुसूदन मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. राजकुमार कौशिक यांच्या पुढाकाराने एक बैठक पार पडली. या वेळी २० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
धर्माच्या आचरणाद्वारेच जन्महिंदू कर्महिंदू बनतील ! – आनंद जाखोटिया
आज भारतात बहुसंख्य हिंदू असले, तरी धर्माचे आचरण करणारे हिंदू अत्यल्प आहेत. हिंदू केवळ शरिराने हिंदू असून मनाने ते ख्रिस्ती झाले आहेत. या हिंदूंना आचरणाने हिंदू बनवायचे असेल, तर धर्माचरणाला पर्याय नाही. आज पाश्चिमात्य देश हिंदु धर्माचा अभ्यास करून तो आचरणात आणत असतांना आपण पाश्चात्त्यांचे अनुकरण करावे, हे अयोग्य आहे. त्यामुळे धर्माचरण करून कर्महिंदू बनूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी या वेळी बैठकीत केले.