Menu Close

जलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी

  • हिंदु जनजागृती समितीची खडकवासला जलाशय रक्षण चळवळ १०० टक्के यशस्वी !

  • कमिन्स इं.लि. आणि अभिनव महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा सहभाग

cummins_hjs_karykarykaerte_manavi_sakhali6
हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते व कमिन्स इंडिया लिमिटेडचे अधिकारी

पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राबवण्यात येणारी खडकवासला जलाशय रक्षण चळवळ यंदाच्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाली. धूलिवंदनाच्या दिवशी रंगाने माखलेली एकही व्यक्ती पाण्यात उतरली नाही. जलाशयाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनीही या चळवळीचे कौतुक केले. मोहिमेच्या अंतर्गत कार्यकर्त्यांनी जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून कुणालाही जलाशयात उतरू दिले नाही. समितीच्या वतीने गेली १४ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

prabodhan_kartana_hjs_karykarte2
तरुणांच्या गटांचे प्रबोधन करताना

सध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा; म्हणून या मोहिमेत सहभागी झालेले कार्यकर्ते जलाशयाच्या भोवती कडे करून उभे होते. या वेळी या ठिकाणी येणार्‍या तरुणांच्या गटांचे प्रबोधन करण्यात येत होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रबोधनात्मक फलक धरून कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MANYAVAR5
मोहिमेत सहभागी मान्यवर

या चळवळीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि माजी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय टेमघरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. भीमराव तापकीर, खडकवासला पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता श्री. एन्.डी. गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. बा.भ. लोहार, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि गोर्‍हे गावचे सरपंच श्री. सचिन पासलकर, गोर्‍हे गावचे माजी सरपंच कुंडलिक खिरीड, सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते. श्री. टेमघरे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या चित्राचे पूजन आणि आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीफळ वाढवून आणि जलदेवतेला प्रार्थना करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

cummins_hjs_karykarykaerte_manavi_sakhali
कमिन्स इंडिया लिमिटेड या आस्थापनाचे अधिकारी

खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेत विविध संघटना, ग्रामस्थ आणि शासकीय कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१. गेल्या ३ वर्षांप्रमाणे कमिन्स इंडिया लिमिटेड या आस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी हेही या वेळी मोहिमेत सहभागी झाले होते.

२. यंदाच्या वर्षी अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

३. येवलेवाडी येथील होय हिंदूच या संघटनेचे धर्माभिमानी, तसेच वडगाव येथील रिक्शा संघटनेचे श्री. राजेंद्र मुळे यांच्यासह १० जण मोहिमेत सहभागी झाले होते.

४. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि माजी पोलीस निरीक्षक यांनी सांगितले, सामाजिक भान जपणारी ही मोहीम अतिशय स्तुत्य आहे. यामुळे जलप्रदूषण रोखण्यास आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास साहाय्य होणार आहे. पाटबंधारे खात्यातील कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांनीही या वेळी साहाय्य केले.

मोहीम यशस्वी होण्यासाठी लाभले सहकार्य !

सौ. गौरी बोरकर, खडकवासला गावच्या माजी सरपंच सौ. मंदाकिनी मते, श्री. महादेव मते, सौ. रजनी कुंभार, श्री. नवनाथ रायकर, अ‍ॅम्ब्युलन्स रिक्शा संघटनेचे अध्यक्ष श्री. दादा गायकवाड, जस्ट फ्रॅन्की उपाहारगृहाचे मालक (खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

क्षणचित्रे

१. पाटबंधारे विभागाच्या वतीने खडकवासला जलाशयात उतरण्यास प्रशासनाच्या वतीनेही प्रतिबंध करण्यात आला असून कुणीही पाण्यात उतरू नये, अशी उद्घोषणा वाहनातून करण्यात येत होती.

२. जलसंपदा विभागाच्या वतीने जलाशयाच्या भोवती धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी जलाशयामध्ये रंग खेळण्यास आणि धरणात उतरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, तसेच याचे उल्लघंन झाल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल, असे फलकही लावण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची उपस्थितांकडून प्रशंसा

१. श्री. भीमराव तापकीर, आमदार, भाजप, खडकवासला विधानसभा मतदारसंघ – हिंदु जनजागृती समिती निरपेक्षपणे राबवत असलेल्या या चळवळीस आमचा पाठिंबा आहे. चांगले कार्य करणार्‍यांना सहकार्य न करता मागे खेचले जाते, खरेतर अशा कार्याचा गौरव झाला पाहिजे. उन्हाची तमा न बाळगता कार्य करणारे असे कार्यकर्ते खरे देशप्रेमी आहेत. या कार्यासाठी कितीही गौरवोद्गार काढले, तरी ते अल्प आहेत. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खर्‍या अर्थाने धर्माचे रक्षणकर्ते आहेत.

२. श्री. बाजीराव पारगे, कल्याण आणि पुनर्वसन समिती सदस्य (पुणे जिल्हा) – हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते दिवसभर उन्हात उभे राहून हे कार्य करत आहेत, याविषयी त्यांचे कौतुक आहे.

अशाच प्रकारची चळवळ २८ मार्च (रंगपंचमी) या दिवशीही राबवण्यात येणार असून त्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *