शाहू जयंतीनिमित्त विद्यालयात हिंदु देवता आणि ब्राह्मण यांच्यावर टीका केल्याचे प्रकरण
धर्मरक्षणासाठी सतर्क राहून तत्परतेने प्रबोधन करणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा !
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : शाहूवाडी तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात २६ जून या दिवशी शाहू जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करण्यात आली. ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर डॉ. संजय गांधी, श्री. विक्रांत मोरबाळे, श्री. प्रसाद कुलकर्णी आणि श्री. सुधाकर मिरजकर या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक अन् पर्यवेक्षक यांचे प्रबोधन केले. प्रबोधनानंतर मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांनी समितीच्या कार्यकर्त्यांची क्षमा मागून यापुढे असे कार्यक्रम घेणार नसल्याचे सांगितले.
१. कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण समाज यांच्यावर टीका करण्यात आल्याने शाळेत ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांनी अवमानकारक टोमणे मारले. यामुळे काही विद्यार्थी दुखावले गेले.
२. हा प्रसंग हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांना समजल्यावर त्यांनी शाळेच्या पर्यवेक्षकांना दूरभाष करून चुकीच्या घटनेची जाणीव करून देऊन निषेध व्यक्त केला. पर्यवेक्षकांनी ‘घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे ते बोलले असावे’, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावर श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी ‘आम्हीही याच शाळेत शिकलो आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून एखाद्या समाजावर जाणीवपूर्वक टीका करण्यास अनुमती आहे, असे नाही, तसेच देवतांवर टीका करणे अयोग्य आहे’, असे खडसावून सांगितले.
३. २७ जून या दिवशी समितीच्या शिष्टमंडळाने शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन झालेली घटना आणि तिचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आणून दिले. ‘शिक्षण संस्था हे विद्येचे माहेरघर आहे. तिथे अशा प्रकारे द्वेषभावना निर्माण करणारे वक्तव्य होणे हे आदर्श आणि नीतीमान विद्यार्थी निर्माण होण्यास अडथळा ठरू शकते’, असे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी मुख्याध्यापकांना सांगितले. त्यावर चूक मान्य करत यापुढे असे प्रकार होणार नसल्याची ग्वाही मुख्याध्यापकांनी दिली.