‘विराट हिंदुस्थान संगम’च्या वतीने संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई : ‘समझौता एक्सप्रेस’मधील बॉम्बस्फोटानंतर स्थानिक पोलिसांनी हा स्फोट लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेने केल्याचे गुन्ह्यात नोंदवले आहे. सुंयक्त राष्ट्र संघानेही हा स्फोट इस्लामिक संघटनांनी केल्याचे मान्य केले आहे; मात्र हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी त्यामध्ये पालट करण्यात आला. चिदंबरम् (काँग्रेसचे माजी मंत्री) यांनी याविषयी स्वत:च्या हाताने ‘अॅफिडेविट’ (प्रतिज्ञापत्र) सिद्ध केले. मालेगाव बॉम्बस्फोटातही हाच प्रकार करण्यात आला. कर्नल प्रसाद पुरोहित यांना केवळ पुढे करण्यात आले. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र केले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला. २९ जून या दिवशी ‘विराट हिंदुस्थान संगम’च्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित आणि ‘हिंदु आतंकवादी’ ठरवून अटक करण्यात आलेले अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना न्याय देण्याची मागणी करणार्या संकेतस्थळाचे उद्घाटन डॉ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विराट हिंदुस्थान संगमचे राष्ट्रीय सचिव जगदीश शेट्टी, या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजय संखे आणि या कार्यक्रमाचे समन्वयक अधिवक्ता एस्. बालकृष्णन् व्यासपिठावर उपस्थित होते.
या वेळी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी पुढे म्हणाले,
१. वर्ष २००५ मध्ये राहुल गांधी यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये ‘इस्लामिक आतंकवादापेक्षा हिंदु आतंकवाद पुष्कळ धोकादायक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना सिमीपेक्षा धोकादायक आहेत’, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अजेंड्यावर ‘हिंदु आतंकवाद’ हा विषय घेण्यात आला. समझौता एक्सप्रेस हे त्याचे पहिले उदाहरण आहे.
२. सोनिया गांधी यांनी हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठी हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. गांधी यांच्या हत्येपासून हिंदूंची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारे कर्नल पुरोहित यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
३. वाजपेयी शासनाच्या काळात भारत शासनाने आतंकवाद नष्ट करण्यासाठी सैन्यामध्ये ज्या उच्च अधिकार्यांची नियुक्ती केली होती, त्यांना अडकवण्याचे काम काँग्रेसने केले. यामुळे भारताची संरक्षणयंत्रणा नष्ट होईल आणि देशावर गांधी घराण्याचे वर्चस्व ठेवता येईल, हा त्यामागील हेतू होता.
४. मालेगाव स्फोटामध्ये अडकवण्यात आलेले आरोपी आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना इतकी वाईट वागणूक देण्यात आली की, त्यांचे पूर्ण स्वास्थ्य बिघडले. त्यामुळे त्यांना आजही नीट चालता येत नाही. लोकशाहीत असे व्हायला नको.
५. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एन्आयएने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) न्यायालयात कर्नल पुरोहित यांच्या घरी एटीएस्ने (आतंकवादविरोधी पथकाने) ‘आर्डीएक्स’ ठेवल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींवरील मोक्का काढून टाकला. आता या प्रकरणातील आरोपींचीही निर्दोष मुक्तता करायला हवी.
६. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी एन्आयएने ८ वर्षे लावली. आरोपपत्र प्रविष्ट व्हायला १ वर्षापेक्षा अधिक काळ लागला, तर गोंधळ निर्माण होतो. कोणत्याही लोकशाही देशात असे कधी होत नाही.
७. एन्आयएच्या अधिकार्यांना वाटले असेल की, वर्ष २०१९ च्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी पुन्हा सत्तेत येतील; मात्र त्यांचा ज्या वाईट पद्धतीने पराभव झाला आहे, ते पहाता काँग्रेस पुन्हा निवडून येणार नाही.
८. सैनिकांवर कोणताही आरोप झाला, तरी सैन्यदलाचे काही नियम असतात. अशा प्रकरणी सैन्यदल स्वत: अन्वेषण करते. कर्नल पुरोहित यांचे ५ वेळा अन्वेषण होऊनही सर्व वेळी सैन्यदलाने त्यांना निर्दोष घोषित केले. हेच काय, तर त्यांच्यावर सैन्यदलाने निलंबनाची कारवाईही केलेली नाही. सैन्यदल ज्या पद्धतीने कर्नल पुरोहित यांच्या पाठीशी उभे राहिले, त्याविषयी मी सैन्यदलाचे अभिनंदन करतो.
९. कर्नल पुरोहित यांच्यावर जी वेळ आली, ती अन्य कोणत्याही हिंदुत्वनिष्ठावर येऊ नये, यासाठी जागृती करण्यासाठी हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोचवून त्यांच्यामध्ये जागृती करायला हवी. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जनतेने कर्नल पुरोहित यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना ग्रंथ भेट !
या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्ह्याचे समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना सनातनने प्रकाशित केलेले ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप और खंडन’ आणि श्री. विक्रम भावेलिखित ‘मालेगांव बमविस्फोट के पीछेका अदृश्य हाथ’ हे हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिले. या वेळी डॉ. स्वामी यांनी व्यासपिठावरून हे ग्रंथ उपस्थितांना दाखवले.
कर्नल पुरोहित यांच्या न्यायासाठी चालू केलेल्या संकेतस्थळाची मार्गिका : www.justiceforltcolpurohit.org
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात