हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी चळवळ राबवली जाते. यासंदर्भात पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदुत्ववादी यांचाही सहभाग असतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनांचा संक्षिप्त वृतांत येथे देत आहोत.
पेण येथे पोलीस उपनिरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन
पेण : येथे पोलीस उपनिरीक्षक धोंडीराम म्हापणकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच आवश्यकता वाटल्यास बंदोबस्तात वाढ करू, असे आश्वासन दिले. येथील नायब तहसीलदार श्री. एम्.आर्. हाडके यांनाही निवेदन देण्यात आले.
नवीन पनवेल आणि जुने पनवेल येथेही पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि ठाणे अंमलदार श्री. टिकले यांना निवेदन देण्यात आले.
पलूस आणि (जिल्हा सांगली) येथे पोलीस ठाणे, तसेच तहसीलदार यांना निवेदन
पलूस (जिल्हा सांगली) : होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावेत, या मागणीसाठी पलूस पोलीस ठाणे, तसेच तहसीलदार श्री. मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री संतोष पाटील, ऋषिकेश होमकर, संजय बिसूरकर, सुमित सांडगे, रोहित पाटील, विजय ढेरे, चेतन गायकवाड, रवींद्र खोत, सुधीर मिसाळ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिराळा (जिल्हा सांगली) : येथेही तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी श्री. अशोक मस्कर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात