काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे येथे ‘फर्स्ट थिंक टँक कॉन्क्लेव्ह’
पुणे : काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. तेथील हिंदूंवर वर्ष १९९० मध्ये झालेले अत्याचार आणि त्यांच्या समस्या या केवळ काश्मिरी हिंदूंच्या नाहीत, तर संपूर्ण विश्वातील हिंदूंच्या समस्या आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी २९ जून या दिवशी येथे झालेल्या ‘फर्स्ट थिंक टँक कॉन्क्लेव्ह’मध्ये व्यक्त केले. ‘काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात संपूर्ण भारतातील हिंदूंनी एकत्र येऊन कार्य करावे’, या उद्देशाने ‘इंडिया फॉर कश्मीर’ या चळवळीच्या अंतर्गत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘काश्मीर स्टडी सेंटर’चे पद्मश्री प्रा. काशीनाथ पंडिता, चित्रपट निर्माते श्री. अशोक पंडित, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते श्री. विवेक अग्निहोत्री, ‘शारदा रेडियो’चे श्री. रमेश हांगलु, भाजपचे जम्मू-काश्मीरचे उपाध्यक्ष श्री. मोती कौल, ‘इंडस स्क्रोल डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या सह संपादक सौ. रती हेगडे, सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये (सोशल मीडियामध्ये) सक्रीयतेने कार्य करणार्या सौ. शेफाली वैद्य, देहली येथील ‘हिंदु चार्टर’च्या सौ. रितू राठोड, मुंबई येथील सौ. मीनाक्षी शरण आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीने काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात राबवलेल्या उपक्रमांविषयी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत आयोजित केलेल्या आठ ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’मध्ये काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ ठराव पारित केले आहेत आणि ते तत्कालीन प्रशासन अन् सरकार यांना दिले आहेत. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र करून देशात अन्य ठिकाणीही अशी निवेदने देण्यात आली. ‘एक भारत अभियान – चलो कश्मीर’ या मोहिमेच्या अंतर्गत भारतभरात २२ ठिकाणी मोठ्या सभा घेण्यात आल्या. ‘सनातन पंचांग’मध्ये ‘काश्मिरी हिंदू विस्थापन दिन’, तसेच ‘होमलॅण्ड डे’ यांना प्रसिद्धी देऊन हा विषय अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘सनातन प्रभात’नेही याची वेळोवेळी नोंद घेतली आहे. जोपर्यंत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत राहील.’’
पद्मश्री प्रा. काशीनाथ पंडिता यांनी काश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार, तसेच त्यांना काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागल्याचा घटनाक्रम यांविषयी माहिती दिली. अन्य मान्यवरांनी ‘काश्मिरी हिंदूंसाठी सर्व भारतातील हिंदूंनी एकत्र का आणि कसे यायला हवे’, याविषयी मत प्रदर्शित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायसपोरा’चे श्री. रोहित काचरू यांनी केले.