पाठ्यपुस्तकात पालट न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची ‘राजपूत समाज सेवा विकास मंचा’ची चेतावणी
पाठ्यपुस्तकात राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करणाऱ्या ‘बालभारती’च्या संबंधितांवर कठोर कारवाई करा !
पुणे : बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या विषयाच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ८ वर महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. या विरोधात ‘राजपूत समाज सेवा विकास मंचा’च्या वतीने बालभारतीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन पाठ्यपुस्तकामध्ये त्वरित सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना देणार असल्याचे सांगितले.
‘हिंदु रक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदु समाज अस्तित्वात नसता. महाराणा प्रताप यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करणे, ही चूक नाही, तर अक्षम्य गुन्हा आहे. अशाने पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रपुरुषांविषयीची आदरभावना नष्ट होईल. या प्रकरणी योग्य त्या सुधारणा झाल्या नाहीत, तर राजपूत समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी मंचाचे अध्यक्ष श्री. सुभाष परदेशी यांनी दिली आहे. मार्च २०१७ मध्ये या पुस्तकाला मान्यता देण्यात आली. (गेल्या दीड वर्षांत महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख कोणाला खटकला नाही का ? शिक्षकांनाही त्यात अयोग्य वाटले नाही का ? पाठ्यपुस्तकाची निर्मिती करणाऱ्यांच्याही ते लक्षात आले नाही का ? कि जाणिवाच बोथट झाल्याने एकेरी उल्लेख अयोग्यच वाटला नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पाठ्यपुस्तकातील अवमानकारक उल्लेख
पाठ्यपुस्तकामधील ‘शिवपूर्वकालीन महाराष्ट्र’ या धड्यामध्ये वायव्येकडील आक्रमणे, सुलतानशाही, विजयनगरचे राज्य, बहमनी राज्य, मोगल सत्ता, महाराणा प्रताप, चांदबिबी, औरंगजेब, अहोमांशी संघर्ष, राजपूतांशी संघर्ष, शिखांशी संघर्ष, मराठ्यांशी संघर्ष या उपमथळ्यांखाली काही ऐतिहासिक घटनांची माहिती दिली आहे. यामध्ये ‘उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासात अजरामर झाला आहे’, असा उल्लेख पुस्तकात आहे.
राष्ट्रपुरुषांचा उल्लेख आदरार्थीच व्हायला हवा. नुकतेच राजस्थानच्या काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकातील ‘वीर सावरकर’ यांच्याविषयीच्या लिखाणातून ‘वीर’ शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काही ओळींमध्ये, तर मोगलांचा इतिहास पाने भरभरून देण्यात आला होता. वीर राजे आणि राष्ट्रपुरुष यांचा तेजस्वी इतिहास दडपून परकीय आक्रमकांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारला, तर स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त पिढी कशी निर्माण होणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात