रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये योगकक्ष आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. शुद्ध हेतूने संस्था चालू झाल्याने तिला देणगीदारांचे साहाय्य मिळत आहे. प्रामाणिक, जागरुक नागरिक घडवणे, हे शिक्षणसंस्थेचे दायित्व असून देशाची मदार शिक्षणावरच आहे. शिक्षण ही विकासाची चावी आहे. बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असावी लागते. यातूनच कोणत्याही आव्हानांना सामोरी जाणारी पिढी निर्माण होणार आहे. ध्येयपूर्तीसाठी झोकून देणारे कार्यकर्ते आहेत. जनतेचा सहभाग असतो तेव्हा कोणताही प्रकल्प यशस्वी होतो. या संस्थेत काम करतांना मला सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि आंतरिक पालट होत गेला, असे उद्गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी येथे केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखाना येथे योगकक्ष आणि ध्यानधारणा केंद्र इमारतीचे भूमीपूजन आणि कै. पार्वतीबाई शंकर केळकर विद्यार्थिनी वसतीगृहात सौर पॅनेल युनिटच्या कामाची पायाभरणी खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी शिल्पाताई पटवर्धन यांनी सांगितले की, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे भारतात नाव आहे. बाबुराव आणि मालतीबाई जोशी यांनी कष्टाने उभी केलेली ही संस्था त्यांच्या आदर्शांवर पुढे नेत आहोत. महाविद्यालयाला ७५ वर्षे, शिर्के प्रशाला ६० वर्षे, विधी महाविद्यालय आणि पीजी विभागाला २५ वर्षे होत आहेत. सौर प्रकल्प आणि योगकक्ष इमारतीच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात