Menu Close

‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकातील महाराणा प्रताप यांच्या एकेरी उल्लेखाविषयी शुद्धीपत्रक

  • राजपूत समाज आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळा’ला जाग !
  • पाठ्यपुस्तकातील पराक्रमी राजांविषयी झालेल्या चुका सुधारण्यास लावणारा राजपूत समाज आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन !

पुणे : बालभारतीने इयत्ता सातवीच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या विषयाच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ८ वर महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे. या विरोधात राजपूत समाज आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आंदोलनाची चेतावणी दिली होती. त्यामुळे अखेर जाग आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळा’ने यावर शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. संचालक डॉ. शकुंतला काळे यांच्या नावे देण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात ज्या ज्या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख आहे, त्या त्या ठिकाणी तो आदरार्थी करण्यात आला आहे. हा पालट शालेय स्तरावरील अध्ययन-अध्यापन प्रकियेशी संबंधित आणि इतर सर्व अनुषंगिक घटकांच्या निदर्शनास आणावा, असे ११ जुलै या दिवशी काढलेल्या शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (शुद्धीपत्रक काढले एवढे पुरेसे नसून ज्यांनी चूक केली, त्यांना काय शिक्षा करणार, हेही सांगणे त्या पत्रकात अपेक्षित होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. या विरोधात ‘राजपूत समाज सेवा विकास मंचा’च्या वतीने बालभारतीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन पाठ्यपुस्तकामध्ये त्वरित सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली
२. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना देणार असल्याचे सांगितले.
३. मार्च २०१७ मध्ये या पुस्तकाला मान्यता देण्यात आली.

पूर्वीचा अवमानकारक उल्लेख

या मध्ये ‘उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासात अजरामर झाला आहे.’

सुधारित आदरार्थी उल्लेख

या मध्ये ‘उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *