मुंबई : ‘पाकिस्तान सरकारने आतंकवादी हाफीज सईद याला अटक करायची आणि न्यायालयाने त्याला जामिनावर सोडून द्यायचे’, या नाटकाचे यशस्वी प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या सावटाखाली असलेल्या पाकने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला, अशी टीका दैनिक सामनाच्या १८ जुलैच्या अग्रलेखामध्ये केली आहे.
अग्रलेखात श्री. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की,
१. हाफीज सईद, त्याच्या आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून भारतावर होणारी जिहादी आक्रमणे, यांविषयी पाकचे धोरण त्याच्या पारड्यात वजन टाकणारेच राहिले आहे; कारण हाफीज सईद याचा बोलवता धनी ‘आय्एस्आय्’ ही पाकची गुप्तचर संघटना आहे. यापूर्वीही स्थानबद्ध केले असतांना त्याची जशी बडदास्त ठेवली, त्यावरून पाकचे नाटक उघड झाले होते.
२. हाफीजच्या अटकेला भारताने त्याच्या आणि पाकिस्तानी आतंकवादाच्या विरोधात जागतिक पातळीवर निर्माण केलेला दबाव कारणीभूत आहे; पण म्हणून ‘इम्रान खान यांचे सरकार उद्या न्यायालयात त्याविरुद्ध सज्जड पुराव्यांची जंत्री सादर करील, हाफीजच्या हाता-पायांत साखळदंड पडतील, त्याला कोलू ओढावा लागेल. पाकिस्तानी न्यायालय मुंबईतील आक्रमणातील निरपराध बळींसाठी अश्रू ढाळत त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावेल’, असे समजण्याचे कारण नाही.
३. ‘ही अटक म्हणजे आणखी एक धूळफेक आहे कि नाही ?’, हे त्याच्या विरोधातील खटला कसा चालतो यावर समजेल. तोपर्यंत ‘हा भारताच्या कूटनीतीचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकड्यांच्या विरोधात निर्माण केलेल्या दबावाचा विजय आहे’, असे म्हणायला हरकत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात