कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती पालटण्याच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत येत असलेली वृत्ते खोटी आहेत. मूर्ती पालटाच्या संदर्भातील कोणतीही चर्चा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पुजारी यांच्यात झालेली नाही. मूर्ती घडवणार्या काही मूर्तीकारांना आम्ही मूर्ती पहाण्यासाठी बोलावले होते; मात्र याचा अर्थ ‘आम्ही मूर्ती पालटणार आहोत’, असा नाही, असा खुलासा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. १९ जुलै या दिवशी काही वृत्तवाहिन्यांवर मूर्ती पालटाच्या संदर्भात पाहणी चालू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर श्री. जाधव यांनी वरील खुलासा केला.
श्री. जाधव पुढे म्हणाले,
१. श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती प्राचीन आणि पुरातन आहे. या मूर्तीत काही अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र नंतर त्यावर वज्रलेप करण्यात आला आहे.
२. पुढील काळात मूर्तीचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करून घेऊ. यानंतर मूर्तीची सद्यःस्थिती पडताळली जाईल. यानंतर देवस्थान समिती देशभरातील धर्मशास्त्र जाणकारांना बोलावून त्यावर चर्चा करील. भारतीय संस्कृतीप्रमाणे धर्मशास्त्र जाणकारांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल.
धर्मशास्त्रानुसार श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पालटून नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणेच योग्य ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
याविषयी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘वर्ष २०१५ मध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाने श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धर्मशास्त्रविसंगत असल्याने त्याच वेळी हिंदु जनजागृती समितीने यास विरोध केला होता; मात्र समितीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. ती पूर्ण झाल्यावर अवघ्या वर्षभरात देवीच्या मूर्तीवरील रासायनिक लेप निघू लागला, तसेच मूर्तीवर पांढरे डाग पडू लागले. मूर्तीची झीज चालूच आहे. देवीच्या मूळ मूर्तीमध्येच पालट करण्यात आला. मूर्तीच्या मस्तकावरील नाग पुसण्यात आला. अशा अनेक गंभीर चुका झाल्या. नंतर या चुकांचे दायित्व कोणीही स्वीकारले नाही. पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी एकमेकांना दोष देत राहिले. मूर्तीची वस्तूस्थिती जरी समोर येत नसली, तरी रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वारंवार उघड होत आहे. त्यामुळे प्रशासन आणि देवस्थान समिती यांनी धर्मशास्त्रानुसार श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पालटून नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणेच योग्य ठरेल.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात