हिंदु समाजाने सनातन परंपरा सोडून पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळणे चिंताजनक ! – सौ. राजश्री जोशी, नगरसेविका, भाजप
उज्जैन (मध्यप्रदेश) : गुरूंना ब्रह्म म्हटले गेले आहे. गुरु यथार्थ ज्ञानाचे महासागर आहेत. गुरु आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात. आपल्याला गुरूंची प्राप्ती करायची असेल, तर आपल्यात शिष्यभाव निर्माण होणे आवश्यक आहे. आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील तिलक स्मृती मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही संबोधित केले.
धर्माला ग्लानी आली, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेचे कार्य केेले ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
शिष्याला गुरूंच्या माध्यमातूनच मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. भौतिकवादात गुरफटलेल्या समाजाला साधनेचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून साधना करवून घेणे, हे गुरूंचे कार्य आहे. जेव्हा धर्माला ग्लानी आली, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेचे कार्य केेले. जो हीन वर्तनाचा त्याग करून स्वत:त सत्त्वगुण निर्माण करतो, तो हिंदु आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र आल्यावर संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल. विश्वाच्या इतिहासात सर्वाधिक आदर्श राज्य रामराज्य आहे आणि आज आपण सर्वजण पुन्हा रामराज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आज संपूर्ण भारतात गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आणि मंदिरांवर आक्रमण करण्यात येत असून कुठेही हिंदू सुरक्षित नाहीत. त्यामुळे भारताला लवकरच हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. सनातनचे साधक श्री. मुकेश खत्री आणि सौ. बबिता खत्री यांनी गुरुपूजन केले.
२. महोत्सवाच्या निमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय गुणांचा परिचय करून देण्यात आला.
३. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या कार्याशी संबंधित दृश्यपट दाखवण्यात आला.
४. सनातनचे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षणविषयक फलकप्रदर्शन लावण्यात आले होते.