नरवीर शिवा काशीद आणि रुद्रप्रतापी बाजीप्रभु देशपांडे यांच्याप्रमाणे आपणही त्यागासाठी सिद्ध असायला हवे ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती
लांजा, २१ जुलै (वार्ता.) : छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा गडावर सिद्धी जोहर याच्या वेढ्यातून सुटतांना गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नरवीर शिवा काशीद यांनी धीरोदात्तपणे बलीदान दिले. तर शिवराय विशाळगडावर सुखरूप पोचावेत, यासाठी ‘लाख मेले, तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’, या स्वामीनिष्ठेने पराक्रमाची शर्थ करून आदिलशाही गनिमांस यमसदनास धाडले. गुरुपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी बाजीप्रभु देशपांडे यांनी वीरमरण पत्करले; मात्र एकाही गनिमास पुढे जाऊ दिले नाही. आजच्या युवकांनी नरवीर शिवा काशीद आणि रुद्रप्रतापी बाजीप्रभु देशपांडे यांच्याप्रमाणे आपणही त्यागासाठी सिद्ध असायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. समीर घोरपडे यांनी केले.
तालुक्यातील गोंधळीवाडी, देवधे येथील श्री. शांताराम गोंधळी यांचे घरी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नरवीर शिवा काशीद आणि महापराक्रमी बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शौर्यजागरण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
देवधे येथील माजी सरपंच श्री. रामकृष्ण गोंधळी यांच्या हस्ते बाजीप्रभु देशपांडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रज्ञा गोंधळी हिने केले. ‘गुरुपौर्णिमेला स्वरक्षण प्रात्यक्षिके करतांना गुरुतत्व कसे अनुभवता आले’, याविषयी कु. स्वरूप गोरुले आणि कु. अंजली गोंधळी यांनी सांगितले.