अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र विभाग, सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित गोरक्षक आणि गोसेवक यांचा मेळावा
सोलापूर : गोसेवा आणि गोरक्षण करणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते; पण हे भाग्य आपल्याला लाभले, यासाठी आपण भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने गोरक्षणासाठी कार्य करायचे आहे. मी केवळ गोमातेच्या आशीर्वादानेच तुमच्यासमोर उभा आहे. गोमातेला कशा प्रकारे पशूवधगृहाकडे नेले जाते, हे येथील स्थानिक मंत्र्यांनाही दाखवा. भाग्यनगर येथे गाय कापण्यापूर्वी कसाई १० वेळा विचार करतो, तसा गोरक्षकांचा दबदबा सोलापूरमध्येही निर्माण करा, असे आवाहन भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते येथील शिवस्मारक सभागृह येथे अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभाग सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित गोरक्षक आणि गोसेवक यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात अनेक गोरक्षकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी व्यासपिठावर महाराष्ट्र अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. मिलिंद एकबोटे, ह.भ.प. लक्ष्मण चव्हाण महाराज, डॉ. नवनाथ दुधाळ, मानद पशूकल्याण अधिकारी श्री. महेश भंडारी, अखिल भारत हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अभयसिंह इंचगावकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. पुरुषोत्तम उडता, विलासभाई शहा, शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर बहिरवडे, शहराध्यक्ष श्री. विजय यादव, बजरंग दलाचे श्री. अंबादास गोरंटला, श्रीराम युवा सेनेचे राजकुमार पाटील, श्रीराम सेनेचे श्री. सिद्धराम नंदर्गी, श्री. बिपीन पाटील, शिवशाही प्रतिष्ठानचे संदीप (आबा) जाधव, प्रतिक्षित परदेशी, अखिल भारत हिंदु महासभेचे संजय साळुंखे, गोरक्षक श्री. अभय कुलथे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.
एका गायीचे प्राण वाचवणे म्हणजे एका ऋषींचे किंवा संतांचे प्राण वाचवण्यासारखे आहे ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, महाराष्ट्र
गोरक्षणाच्या कार्यात गोसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. गाय वाचली, तर हिंदुस्थान जिंकेल आणि कापली, तर पाकिस्तान जिंकेल. गोसेवा म्हणजे भारतमातेची सर्वांत मोठी पूजा केल्याप्रमाणेच आहे. एका गायीचे प्राण वाचवणे म्हणजे एका ऋषींचे किंवा संतांचे प्राण वाचवण्यासारखे आहे. गोहत्येच्या माध्यमातून अतिरेक्यांना पैसा पुरवला जातो. त्यामुळे प्रशासनाने गोहत्या रोखण्यासाठी गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी.
गायीपासून मिळणारे पंचगव्य हे मानवासाठी पंचमहाभूतांप्रमाणे कार्य करतात ! – डॉ. नवनाथ दुधाळ
गायीपासून मिळणारे पंचगव्य हे मानवासाठी पंचमहाभूतांप्रमाणे आहे. गाय विकतो, तोच खरा कसाई. त्यामुळे गाय विकू नका, तुम्हाला गाय नको असेल, तर तिला माझ्याकडे सोपवा.
गोहत्येमुळेच देश दरिद्री झाला ! – ह.भ.प. लक्ष्मण चव्हाण महाराज
गायीच्या सेवेचे महत्त्व सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला. गोहत्येमुळेच देश दरिद्री झाला. त्यामुळे नगरसेवक नको, जनसेवक नको, तर गोसेवक बना.
आमदार टी. राजासिंह हे अन्य एका कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांना ‘सोलापूर येथे गोरक्षकांचा मेळावा आहे’, हे समजल्यावर ते स्वत:हून कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी मार्गदर्शनातून गोरक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात