ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या जुन्या लेखात दावा
लंडन : ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर त्यांच्या जुन्या लेेखावरून टीका होऊ लागली आहे. या लेखात त्यांनी म्हटले होते, ‘मुसलमान इस्लाममुळे पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत काही शतके मागास राहिलेले आहेत आणि ते पुढे जाऊ शकलेले नाहीत. इस्लामने जगातील अनेक देशांतील विकासाचा मार्गच थांबवला.’ याच लेेखातील त्यांच्या विचारांमुळे त्यांच्या पक्षातील महंमद आमीन यांनी त्यागपत्र दिले आहे. ते गेल्या ३६ वर्षांपासून पक्षात असून सध्या पक्षात मुसलमान शाखेचे प्रमुख होते. आमीन यांच्यासह आणखी काही जणांनी पक्षाचे त्यागपत्र दिले आहे.
आमीन म्हणाले की, आता जे (बोरिस जॉनसन) पंतप्रधान बनले आहेत, ते नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत. ते अधिक काळ पंतप्रधानपदी राहू शकणार नाहीत. ते पदावरून उतरले की, मी पुन्हा पक्षात येऊ शकतो.’
जॉनसन यांच्या लेखातील काही सूत्रे
१. जगातील वैश्विक संघर्षाचा तुम्ही विचार केला, तर बोस्निया तेे पॅलेस्टाईन, इराक ते काश्मीरपर्यंतच्या संघर्षामध्ये मुसलमानांच्या असंतोषाचाच भाग होता.
२. इस्लामविषयी असे काहीतरी नक्कीच असले पाहिजे की, ज्यामुळे मुसलमानांमध्ये नवउदारतावाद आणि लोकशाही यांचा प्रसार का होऊ शकला नाही ?
३. इस्लाममध्ये तांत्रिक आणि सांस्कृतिक प्रगती न होण्यामागे धर्माची मोठी भूमिका होती. रोमन साम्राज्याच्या वेळी ‘कॉन्सटँटनोपल’ शहरामध्ये आधुनिक ज्ञान ओसंडून वहात होते; मात्र तुर्कस्थानच्या इस्तंबूलमध्ये १९ व्या शतकापर्यंत छपाईचे यंत्रही पोेचले नव्हते. अशी कोणती तरी गोष्ट असणार, ज्यामुळे मुसलमान काही शतके मागे राहिले.
४. इस्लामी कलेमध्ये १६व्या शतकापर्यंत मायकल एंजलोच्या उत्कृष्ट कलाकृतीप्रमाणे एकही कलाकृती निर्माण झाली नाही.
५. ज्या महिला बुरखा घालतात, त्या एखाद्या ‘पत्रपेटी’प्रमाणे किंवा बँकेत दरोडा घालणार्यांप्रमाणे वाटतात.
६. विस्टन चर्चिल यांच्या एका लेखात म्हटले आहे की, जगात मागे ढकलणार्यांमध्ये इस्लामहून अधिक शक्तीशाली कोणी नाही.
७. आम्ही चर्चिल ते पोप यांच्या आरोपांची खोलवर जाऊन तपासणी करायला हवी. इस्लामी जगाची मूळ समस्या इस्लामच आहे. आम्हाला प्रामाणिक होऊन हे स्वीकारले पाहिजे की, चर्चिलच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांच्या विश्लेषणामध्ये सत्यता आहे.
८. मी आशा करतो की, मला कोणी ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामद्वेषाने पीडित) म्हणू नये; कारण माझे पणजोबा, तुर्कस्थानचे नेते अली केमाल हेही एक मुसलमान होते. (‘केमाल यांनी तुर्कस्थानला इस्लामच्या रूढी, परंपरा यांतून बाहेर काढून आधुनिक बनवले’, असे मानले जाते.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात