युवकांपुढे मांडला हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील शौर्याचा इतिहास !
नांदेड : ‘लढावे तर असे लढावे की, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे’, हे बोल सार्थ करून दाखवणारे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा बलीदानदिन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठिकठिकाणी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात गाजवलेला अतुलनीय पराक्रम या कार्यक्रमांच्या माध्यमांतून युवापिढीपुढे मांडण्यात आला आणि त्यांना राष्ट्रकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
३०० मावळे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांसह घोडखिंड लढवून सिद्दी जोहर याच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांना पन्हाळागडावरून विशाळगडापर्यत सुखरूप पोचवणारे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांना समस्त राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी या कार्यक्रमांतून मानवंदना दिली.
नांदेड येथे ‘होय हिंदूच’ या संघटनेकडून कार्यक्रमाचे आयोजन !
नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी ‘होय हिंदूच’ या संघटनेकडून नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानदिनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि बाजीप्रभु देशपांडे यांची प्रतिमा यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थित युवकांपुढे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास मांडला. या वेळी ‘होय हिंदूच’ या संघटनेचे सर्वश्री गौरव वाळिंबे, गिरीश रघुजीवार, आकाश कापकर, पवन यादव, खुशाल यादव, रोहित काळे, अजय यादव, सौरभ कांधरकर, लकी ठाकूर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे उपस्थित होते.
जळगाव येथे धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रतिज्ञा !
जळगाव येथील एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील हनुमान मंदिरात धर्मप्रेमी श्री. जितेंद्र चौधरी आणि त्यांचे सहकारी यांनी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानदिनाचे आयोजन केले होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. या वेळी उपस्थित युवकांनी ‘बाजीप्रभु यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शर्थीने प्रयत्न करू’ अशी प्रतिज्ञा केली.
संभाजीनगर येथे बाजीप्रभु यांच्या शौर्याचा इतिहास मांडून सादर करण्यात आली स्वरक्षणाची प्रात्यक्षिके !
संभाजीनगर येथील भांगसी मातागड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने त्यांचा शौर्यशाली इतिहास श्री. निरंजन चोडणकर यांनी युवकांपुढे मांडला. या ठिकाणी १५ राष्ट्र आणि धर्म प्रेमी युवक उपस्थित होते. या ठिकाणी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली.