विदेशातील हिंदूंनी निषेध नोंदवल्याचा परिणाम ! भारतातील हिंदूंनी विरोध केल्यावर येथील किती आस्थापने देवतांचा अवमान करणार्या उत्पादनांची त्वरित विक्री थांबवतात !
(हे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील सांताक्रूझ येथील ‘मर्ज ४’ या मोजे उत्पादन करणार्या आस्थापनाने श्री गणेशाचे चित्र असलेल्या मोज्यांचे उत्पादन करून ते विक्रीस ठेवले होते. त्यामुळे संतप्त हिंदूंनी त्यांच्याकडे निषेध नोंदवला. अमेरिकेतील हिंदूंचे धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी ‘मर्ज ४’ या मोजे उत्पादन करणार्या आस्थापनाला पत्र पाठवून ‘हे उत्पादन त्वरित बाजारातून परत मागवावे आणि हिंदूंची जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी केली होती. हिंदूंच्या या विरोधानंतर ‘मर्ज ४’ आस्थापनाचे संस्थापक सिंडी बुसेनहार्ट यांनी श्री. राजन झेद यांना इ-मेल पाठवून हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याविषयी क्षमा मागितली आणि या मोज्यांचे उत्पादन, तसेच विक्री थांबवल्याचे त्यांना कळवले. ‘श्री गणेशाचे चित्र मोज्यांवर छापण्यामागे हिंदु धर्माची अवहेलना करण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता’, असेही बुसेनहार्ट यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. श्री. झेद यांनी सिंडी बुसेनहार्ट यांच्या तत्पर कृतीविषयी आभार व्यक्त केले आहेत. या यशाविषयी हिंदु श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात