कर्नाटक राज्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवात हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले विचार
बेंगळूरू : सर्वजण सुखी व्हावे, हेच हिंदु राष्ट्राचे ध्येय आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या रूपात श्रीकृष्णच मार्गदर्शन करत आहे. गुरूंच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हेच आमचे ध्येय झाले आहे आणि हीच आमच्यासाठी गुरुपौर्णिमा आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी बेंगळूरू येथील गुरुपौर्णिमा उत्सवात केली.
या महोत्सवात सनातनचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
संघटित होऊन हिंदु मंदिरे परत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, सर्वोच्च न्यायालय, बेंगळूरू
हिंदूंची देवस्थाने कह्यात घेणारे सरकार इतर धर्मियांच्या धार्मिक केंद्रांना कह्यात घेण्याचे धाडस करत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून राज्य सरकारने आजपर्यंत ४ लाख मंदिरे गिळंकृत केली आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी संघटित होऊन आपली देवस्थाने परत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत देवस्थाने हिंदूंंच्या कह्यात येत नाहीत, तोपर्यंत हिंदू त्यांच्या राज्यात स्वतंत्र नाहीत.
सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देणे, ही काळाची आवश्यकता ! – विजयशेखर, निवृत्त प्रबंधक, ‘युनाइटेड इंडिया’ विमा आस्थापन
सुखी समाजासाठी सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन होणे अत्यावश्यक आहे. या दिशेने हिंदु जनजागृती समिती उत्तम कार्य करत आहे, असे ‘युनाइटेड इंडिया’ विमा आस्थापनाचे निवृत्त प्रबंधक श्री. विजयशेखर यांनी सांगितले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. देवकी पुंडरिक आणि रणरागिणी शाखेच्या सौ. भव्या गौडा यांनीही संबोधित केले.
मैसुरू
गुरूंना शरण जाऊन जीवन जगले पाहिजे ! – अधिवक्ता केशवमूर्ती
मैसुरू येथील करुमारियम्मा कल्याण मंडपामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या वेळी मार्गदर्शन करतांना अधिवक्ता केशवमूर्ती म्हणाले, ‘‘ज्या प्रमाणे सम्राट चंद्रगुप्ताने त्याचे गुरु चाणक्य यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांचे आज्ञापालन केले, त्याचप्रमाणे आपणही गुरूंना शरण जाऊन आपले जीवन जगले पहिजे.’’
क्षणचित्रे
१. ‘राज्यधर्म’ दूरचित्रवाहिनीने गुरुपूजनाचे चित्रीकरण केले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवराम यांची मुलाखत घेऊन ती प्रसारित केली. या समवेतच ३ दूरचित्रवाहिनींच्या पत्रकारांनीही महोत्सवाचे चित्रीकरण केले.
२. राष्ट्रीय हिंदु महासंघाच्या अध्यक्षांनी सर्व मठांमध्ये धर्मशिक्षणाची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला अनुमती मिळवून देणार असल्याचे सांगितले.
शिकारीपूर
येथील जैन मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिवमोग्गा क्षत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. दिनेश चौहान आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. कावेरी रायकर यांनी संबोधित केले.
सर्व मातांनी त्यांच्या मुलांना धर्मशिक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडवावे ! – दिनेश चौहान, अध्यक्ष, क्षत्रीय मराठा समाज
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी धर्माची परिस्थिती आजच्यासारखीच होती. आज आपल्याला पुन्हा हिंदु राष्ट्र (हिंदवी स्वराज्य) स्थापन करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. सर्व मातांनी त्यांच्या मुलांना धर्मशिक्षण देऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडवावे.
न्यामती
न्यामती येथील महांतेश्वर वीरशैव कल्याण मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या वेळी अधिवक्त्या (सौ.) विजया उमाकांत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. परशुराम यांनी संबोधित केले.
क्षणचित्र : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना ‘सनातन वह्या’ वितरित करणार असल्याचे एका धर्माभिमान्याने सांगितले.
कुमटा
गुरु-शिष्य परंपरेचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे ! – सी.डी. नायक, निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी, गोकर्ण.
सनातन हिंदु धर्माचा पाया, म्हणजे गुरु-शिष्य परंपरा आहे; परंतु आज समाजात, तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार माजून गुरु-शिष्य परंपरा नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या परंपरेचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन गोकर्ण येथील निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी सी.डी. नायक यांनी केले.
सुळ्या (वळलंबे)
येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात बाकिल गावातील उद्योजक तथा हिंदुत्वनिष्ठ श्री. सुब्रह्मण्य शास्त्री यांच्यासह अनेक जिज्ञासू उपस्थित होते. कार्यक्रमात सुळ्या तालुक्यातील अरंबुरु वेदाध्ययन शाळेचे प्राचार्य वेदमूर्ती व्यंकटेश शास्त्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिष्याच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व अत्यंत सहजतेने समजावून सांगितले. नामस्मरण, धर्माचरण यांचे महत्त्व सांगून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा उद्देश सांगितला.
भटकळ
गुरूंविना साधना करणे शक्य नाही ! – अधिवक्ता धन्यकुमार जैन, भटकळ
इतिहास पाहिल्यास पूर्वीच्या काळी शिष्यांच्या पाठीशी त्यांच्या गुरूंची शक्ती असायची. याचा अनुभव आजही भारतात आपण घेत आहोत. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम त्यांच्या गुरूंचे नेहमी अत्यंत श्रद्धेने स्मरण करायचे. असे शास्त्रज्ञ भारताला लाभले. गुरूंशिवाय साधना करणे शक्य नाही, असे प्रतिपादन अधिवक्ता धन्यकुमार जैन यांनी भटकळ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.
विजयपूर
विजयपूरच्या श्री कालिकादेवी देवस्थानात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. सनातन संस्थेचे श्री. काशीनाथ प्रभु यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अद्वितीय कार्याविषयी उपस्थितांना माहिती करून दिली. धर्मप्रेमी श्री. शरणु रेवडी यांनी सांगितले की, भारत म्हणजे तत्त्वज्ञानाची भूमी आहे. आपला धर्म हा यज्ञयागाने भरलेला आहे. आपण आपले घर स्वच्छ करू शकतो; परंतु आपले मन केवळ गुरूच स्वच्छ करू शकतात. अशा अमूल्य दिनी त्यांचे स्मरण करून भारतीय संस्कृतीत अगाध महत्त्व असलेली गुरुपौर्णिमा साजरी करूया.
शिवमोग्गा
शिवमोग्गा येथील श्री व्यंकटेश्वर सभा भवनात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून अधिवक्ता सुब्रह्मण्य आणि हिंदु जनजागृती समितीचे उडुपी जिल्हा समन्वयक श्री. विजयकुमार उपस्थित होते.
परात्पर गुरुदेवांची पाद्यपूजा म्हणजे त्यांचे आदर्श व्यक्तीमत्त्व जोपासणे ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य
समाजाचे सेवाकेंद्र असलेल्या प्रमुख भागातच आज भ्रष्टाचार होत आहे. ते थांबवण्यासाठी प्रत्येकाने संघभावाने प्रयत्न करून भारताला विश्वगुरु, आदर्श राष्ट्र बनवले पाहिजे. असे राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या सनातन संस्थेचे गुरु परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आदर्श व्यक्तीत्त्वाचे आचरण करणे आवश्यक आहेे.