देहली येथे सरस्वती अनटोल्ड कार्यक्रमाचे आयोजन
देहली : रोमीला थापर यांच्यासारख्या लोकांनी हिंदूंचा सत्य इतिहास लपवून इंग्रजांना अपेक्षित असा इतिहास लोकांवर थोपवला. अशा पाखंडी इतिहासकारांचे पितळ उघडे करण्यासाठी मी सरस्वती सिव्हिलायझेशन हे पुस्तक लिहिले आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी द्रविड आणि आर्य वाद निर्माण करण्यात आला. आर्य बाहेरच्या देशातून आले, असा खोटा सिद्धांत मांडण्यात आला. आज डीएन्ए चाचण्या, वंश शास्त्रज्ञ, इतिहासाचे पुनर्विलोकन यांद्वारे हा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू आणि सत्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवू, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले.
अयोध्या फाऊंडेशनच्या वतीने येथील आंध्र असोसिएशनच्या सभागृहामध्ये सरस्वती अनटोल्ड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निवृत्त मेजर जनरल बक्शी बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुंंबई येथील व्यावसायिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीनाक्षी शरण यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, डेक्कन युनिव्हर्सिटीचे डॉ. वसंत शिंदे, अमेरिकास्थित प्रसिद्ध विचारवंत आणि इन्फिनिटी फाऊंडेशनचे संस्थापक श्री. राजीव मल्होत्रा, तसेच गरुड प्रकाशनचे संस्थापक श्री. संक्रात सानु यांनीही मार्गदर्शन केले.
सरस्वती (नदी) ही आमचा वारसा आहे ! – सौ. मीनाक्षी शरण
सरस्वती (नदी) ही आमचा वारसा आहे. ती पृथ्वीवरून लुप्त झाली असली, तरी संस्कृतीच्या रूपाने आजही जिवंत आहे. आम्ही परिश्रमपूर्वक तिचे संवर्धन करू. तिच्या काठावर वसणारी संस्कृती पुनर्जीवित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.
आपली संस्कृती, परंपरा, सभ्यता यांची पुन्हा ओळख करून देण्यासाठी सौ. शरण यांचा प्रयत्न अत्यंत्य स्तुत्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
विस्मरण झालेली आपली संस्कृती, परंपरा, सभ्यता यांची जगाला पुन्हा ओळख करून देण्यासाठी सौ. शरण यांनी केलेला पहिला प्रयत्न अत्यंत्य स्तुत्य आहे. सौ. शरण यांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यांसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी त्यांचे अभिनंदन !
क्षणचित्रे
१. कार्यक्रमात मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी लिहिलेले सरस्वती सिव्हिलायझेशन या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
२. ओडिशामधील रुद्राक्ष फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ऋग्वेद आणि यजुर्वेद यांमध्ये सरस्वतीचा उल्लेख अन् देवतांचा संवाद असलेल्या श्लोकांवर आधारित अप्रतिम ओडिसी नृत्य सादर केले.
३. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्या हस्ते नृत्य कलाकारांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमास श्री. सुशील पंडित, रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, हिंदु टेरर इनसाईड अकाऊंट अॅाफ मिनिस्ट्री अॅाफ होम अफेअर्स या पुस्तकाचे लेखक श्री. आर्.व्ही.एस्. मणि, विचारवंत तथा लेखक प्रा. मधु पूर्णिमा किश्वर आणि इंडस स्क्रोल संकेतस्थळाच्या सहसंपादिका सौ. रती हेगडे आदी.