मुंबई : जम्मू-कश्मीरमध्ये तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार येत आहे. मेहबुबा यांनी भाजपशी नव्याने घरोबा करण्यास नकार दिला व पुढचे तीन महिने कश्मीर खोर्यात भाजपला कान धरून उठाबशा काढायलाच काय ते बाकी ठेवले, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-पीडीपी संबंधावर टीका केली आहे.
पक्षाचे मुखपत्र सामनात यावर अग्रलेख लिहून मेहबुबा मुफ्ती या कश्मीरच्या मुख्यमंत्री होत असल्याने काही प्रश्नांना तोंड फुटले आहे. यावर शिवसेनेने भाजपवर टीका केली.
अग्रलेखात म्हटले आहे की, तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जम्मू-कश्मीर राज्यात सरकारचा पाळणा पुन्हा एकदा हलला आहे. मेहबुबा मुफ्ती जम्मू-कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील व भाजपचे वर्हाडी या सोहळ्यात त्यांच्यावर अक्षता, फुलांचा वर्षाव करतील.
मेहबुबाबाईंची देशविरोधी मुफ्ताफळे, त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले संबंध हा नेहमीच वादाचा विषय राहिला. कश्मीरमध्ये हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणाऱ्यांना या बाईसाहेबांची सहानुभूती राहिली व हे सर्व उघड उघड होत राहिले. त्यामुळे मेहबुबा भाजपच्या पाठिंब्याने कश्मीरच्या मुख्यमंत्री होत आहेत याचे कौतुक भाजपला असले तरी देशाला मात्र चिंता आणि चिंताच वाटत आहे. त्यामुळे काही प्रश्नांना तोंड फुटले आहे, अशी टीका अग्रलेखात केली आहे.
संदर्भ : दिव्य मराठी