नवी देहली येथे ‘सेंट्रल मार्केट शॉपकीपर्स असोसिएशन’च्या वतीने व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन
नवी देहली : व्यवसाय करत असतांना व्यावसायिकांनी सामाजिक भान ठेवणे महत्त्वाचे आहे. पुष्कळ पैसे मिळाले, सुख उपभोगण्याची साधने मिळाली; म्हणून मनुष्य सुखी होत नाही, हे विदेशातील लोकांच्या प्रकर्षाने लक्षात येत आहे. अमेरिकेत बहुतांश लोक श्रीमंत आहेत; पण तेथील समाज सुखी नाही. घटस्फोट, अमली पदार्थांचे सेवन, आत्महत्या, अशा अनेक समस्यांनी पूर्वेकडील देशांना वेढले असून ते मन:शांतीसाठी साधनेकडे वळू लागले आहेत. भारतालाही आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे. यावर हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच उपाय आहे आणि ते स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले.
‘सेंट्रल मार्केट शॉपकीपर्स असोसिएशन’च्या वतीने लाजपतनगर-२ येथील व्यावसायिकांसाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधना’ यांविषयी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यावसायिकांना संबोधित करतांना सद्गुुरु (डॉ.) पिंगळे बोलत होते. याप्रसंगी ‘सेंट्रल मार्केट शॉपकीपर्स असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. योगेंद्र डावर, उपाध्यक्ष श्री. सुखदेव सिंह, श्री. गोपाल डावर, पुष्पा मार्केटचे अध्यक्ष श्री. श्यामसुंदर शर्मा, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कुमार गाबा, उपाध्यक्ष श्री. जॉय, जनरल सेक्रेटरी श्री. राकेश नारंग, श्री. संजय सेठी, श्री. पंकज संधु आदी व्यावसायिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शंकानिरसन करण्यात आले. सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी केले.
सनातनच्या वतीने कार्यक्रमस्थळी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.