केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ आणि ‘३५-अ’ हटवून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ७० वर्षांपूर्वी केलेले पाप मोदी सरकारने धुवून काढले आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करते. कलम ३७० हटवून भारतमातेच्या मस्तकावरील भार हलका केला आहे. आता काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्यात पुनर्वसन करून सुवर्ण मुकुट चढवावा, अशी मागणी करत ‘ही तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदी’ असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
‘कलम ३७० रहित करावे, ही मागणी देशभक्त नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक स्तरांवर लावून धरली होती. आज या मागणीला न्याय मिळाला. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी जाहीर सभा अन् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन यांमधून कलम ३७० हटवण्याविषयी आवाज उठवला होता.
आता सरकारने काश्मीरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची पुनर्स्थापना करावी, तेथील विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदु बांधवांचे काश्मीर खोर्यात पुनर्वसन करावे, गेल्या ७० वर्षांत जम्मू-काश्मीर विधानसभेने केलेले देशविरोधी कायदे रहित करावेत आणि रोहिंग्या मुसलमानांना दिलेला आश्रय रहित करून त्यांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीने केल्या आहेत. हिंदूंच्या या मागण्यांवर केंद्रशासन निश्चितच कारवाई करेल, अशी आम्हाला निश्चिती आहे’, असेही श्री. शिंदे यांनी या पत्रकात म्हटले आहे.