यात नवीन काहीच नाही. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि तो भारताने परत घेणे, हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे पाकने स्वतःहून तो भारताच्या कह्यात द्यावा, अन्यथा परिणामांना सिद्ध रहावे !
नवी देहली : मी भारतात काम करत होतो, तेव्हा ऑक्टोबर २०१४ मध्ये भाजपचे नेते राम माधव यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा ‘जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘कलम ३५ अ’ हटवण्यात येईल. तसेच पाकव्याप्त काश्मीरसुद्धा भारत परत घेईल’, असे त्यांनी म्हटले होते, असा दावा पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केल्यानंतर पाकच्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
१. अब्दुल बासित यांनी सांगितले की, राम माधव यांच्या कार्यालयात आमची बैठक जवळपास एक घंटा चालू होती. त्या वेळी त्यांनी जे सांगितले, ते मी याठिकाणी सांगू शकत नाही; मात्र त्यांच्याकडून जो संदेश मिळाला तो स्पष्ट होता. ते म्हणाले होते, ‘‘हाय कमिशनर साहेब, पाकिस्तान आता त्याचा वेळ वाया घालवत आहे. हे जे सूत्र आहे, ते तुम्ही समजून घेणार कि ‘हुर्रियत हुर्रियत’ खेळत बसणार? हे सूत्र आता संपले असे समजा. ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ हेही रहित होईल. तुम्ही चिंता करा की, तुमच्याकडून पाकव्याप्त काश्मीरसुद्धा घेतले जाऊ नये.’’ ही एकप्रकारे चेतावणी होती.
२. अब्दुल बासित पुढे म्हणाले, ‘‘आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जातील आणि म्हणतील, ‘जर भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करणार असाल, तर तुम्ही पाकव्याप्त काश्मीरवर मध्यस्थी करा, जो अद्याप पाकिस्तानच्या कह्यात आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात