अमरावती : प्लास्टिकच्या वापरावर बंदी असूनही १५ ऑगस्ट या दिवशी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. वापर करून झाल्यावर राष्ट्रध्वज इतरत्र पडून त्याचा अवमान होतो. त्यामुळे शहरात खुलेपणाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती शहरात पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार, शिक्षणाधिकारी श्रीमती निलिमा टाके यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनासह ‘बकरी ईद’च्या निमित्ताने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोवंशियांची हत्या थांबवण्याविषयी कठोर पावले उचलावीत’ आणि ‘गणेशोत्सवाच्या काळात प्रदूषणाच्या नावाखाली कृत्रिम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करून त्याची होणारी घोर विटंबना थांबवावी अन् कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी घालावी’ या मागण्यांची निवेदनेही अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार तसेच मनपा उपायुक्तांना देण्यात आली. दर्यापूर तालुक्यातील शिक्षणाधिकारी बाळासाहेब घाटे, तहसीलदार श्री. अमोल कुंभार यांना आणि पोलीस मुख्याधिकारी यांच्या वतीने लिपिकांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विशेष
१. अमरावती जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी मुख्याध्यापकांना समितीच्या निवेदनानुसार राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे यांविषयीचे आदेश पत्र दिले, तसेच हिंदु जनजागृती समिती, अमरावतीच्या नावाने त्याची प्रतही दिली.
२. निवासी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी समितीच्या निवेदनानुसार जिल्ह्यात आदेश काढण्याचे आणि याविषयीची ध्वनिचित्रफीत शहरातील सिनेमागृहात दाखवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही चांगले कार्य करत असल्याचे म्हटले.
३. दर्यापूर येथील तहसीलदारांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही मागच्या वर्षी अशा प्रकारचे निवेदन दिल्यावर आम्ही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर कारवाई केली होती. तुम्ही चांगली जागृती करत आहात. यावर्षीही आम्ही तुम्हाला सहकार्य करू.’’
४. दर्यापूर येथील निवेदनात धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींचा सहभाग होता.