हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ
पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ राबवण्यात येत आहे. चळवळीचा एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना, तसेच धर्मप्रेमी यांच्या वतीने लोकप्रतिनिधी, शासकीय कार्यालय येथे राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात येत आहे. याच अंतर्गत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. त्या वेळी शिक्षणाधिकारी श्री. सुनील कुर्हाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पत्र दिले.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकांविषयी जागृती करण्याविषयीचे पत्र कार्यालयास प्राप्त झाले. आपण राबवत असलेला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ उपक्रम अतिशय चांगला आहे. या उपक्रमाविषयी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून, चर्चा करून उपक्रम राबवावा. आपली विनंती विचारात घेऊन या उपक्रमासाठी आपल्याला अनुमती देत आहोत.’ हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या या चळवळीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.