भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये वारंवार नाक खुपसणार्या विस्तारवादी चीनलाही आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे !
बीजिंग : जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाची हानी होत आहे. भारत आणि चीन यांच्या पश्चिमेकडील सीमारेषेवरील चीनचा भाग भारताकडून त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात दाखवला जातो, याला चीनचा नेहमीच विरोध राहील. नुकतेच भारताने त्यांच्या देशांतर्गत कायद्यात पालट करून चीनच्या भूभागाची हानी केली आहे. भारताची ही भूमिका स्वीकारार्ह नाही, तसेच भारताने यासंदर्भातील कराराचे पालन करायला हवे, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी व्यक्त केली.
‘सीमा प्रश्नाविषयी शब्द वापरतांना आणि कृती करतांना सावधगिरी बाळगावी. सीमाप्रश्न अधिक जटील बनेल, अशी कृती टाळावी’, असे आवाहन आम्ही भारताला करतो. भारताने जम्मू-काश्मीरचे विभाजन करून आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ‘अक्साई चीन हा भारताचा भाग आहे’, असे म्हटल्यावर चीनने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारत आणि चीन यांच्यात सीमारेषेवरून वाद आहेत. त्यात अक्साई चीनचा भाग लडाखमध्ये येतो; मात्र सध्या तो चीनच्या कह्यात आहे. त्यामुळे लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यास चीनने विरोध दर्शवला आहे.
भारताच्या अंतर्गत प्रश्नाविषयी चीनने बोलू नये ! – भारत
चीनच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देतांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, ‘‘भारत कधीही अन्य देशांच्या अंतर्गत प्रकरणांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. त्यामुळे भारतालाही इतर देशांकडून अशाच प्रकारची भूमिका अपेक्षित आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमाप्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही शांतता राखण्याचे धोरण अवलंबले आहे.’’
लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्याने भारतद्वेषी चीनने कैलास मानसरोवर यात्रेकरूंना नाकारला ‘व्हिसा’ !
कैलास मानसरोवर या तीर्थस्थळी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय भाविकांना चीनने ‘व्हिसा’ नाकारला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने ही कृती केली आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात