समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलिसांना निवेदन
मुंबई : मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ३१ जुलै या दिवशी मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये अंनिसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सत्यसाईबाबा आणि जगद्गुरु रामानुजाचार्य नरेंद्र महाराज यांना भोंदू ठरवणारे वक्तव्य केले. अंनिसची हिंदूंच्या देवता, संत, श्रद्धास्थाने यांचा सातत्याने अवमान करण्याची पार्श्वभूमी ओळखून राज्यस्तरीय अधिवेशनातही हिंदूंच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली जाण्याची शक्यता आहे. अंनिसचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध यापूर्वीच समोर आले आहेत. ही वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेऊन अंनिसच्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला अनुमती नाकारण्यात यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.
याविषयीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांना देण्यात आले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. रमेश गुप्ते, बजरंग दलाचे श्री. अरुण भाई उपस्थित होते. ७ ऑगस्ट या दिवशी अधिवक्ता संतोष दुबे, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. प्रकाश सावंत आदी हिंदुत्वनिष्ठ अंनिसच्या या अधिवेशनाला अनुमती नाकारावी, यानिमित्त निवेदन देण्यासाठी मुलुंड पोलीस ठाणे येथे गेले होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. अंनिसच्या कार्यक्रमासाठी विदेशातून काही लोक येणार असून ते वक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. विदेशातून काही दिवसांसाठी येणारे हे लोक टुरिस्ट व्हिसावर येतात. कायद्यानुसार त्यांना अन्य देशात जाऊन वक्ता म्हणून मार्गदर्शन करता येत नाही. तसे करणे हा कायद्याने गुन्हा असून तसे घडल्यास संबंधित आयोजक आणि सभागृहाचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी आमची मागणी आहे.
२. वरवर पहाता हा एक कार्यपूर्ती सोहळा वाटत असला, तरी अंनिसचा यापूर्वीचा इतिहास आणि पार्श्वभूमी पहाता त्यांनी वेळोवेळी हिंदूंच्या देवता, संत, श्रद्धास्थाने यांचा अवमान केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सर्व संतांना भोंदू ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाने नक्षलवाद्यांशी संबंधित संघटनांच्या राज्यशासनाला दिलेल्या सूचीमध्ये अंनिसचेही नाव समाविष्ट आहे.
३. अशा प्रकारे अंनिसचे पदाधिकारी कार्यक्रमात हिंदूंच्या देवता, संत आणि श्रद्धास्थाने यांच्यावर टीका करतात. यावरून सामाजिक वादंग निर्माण झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
४. केंद्रशासनाने नुकतेच जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने राज्यासह देशभरात परिस्थिती गंभीर आहे, तसेच मुंबईसह राज्याची पूरस्थिती पहाता आणि आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुका यांमुळे समाजातील वातावरण संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत अंनिसच्या कार्यक्रमामुळे वा वादग्रस्त विधानांमुळे कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोेचू शकते.
अंनिसने शाळांमध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून जमा केलेला लाखो रुपयांचा निधी, या प्रकल्पामध्ये देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये उपस्थित केलेले श्रद्धाभंजक प्रश्न, स्वयंसेवी संघटनांकडून निधी घेऊन त्याचा लेखाअहवाल धर्मादाय आयुक्तांना न देणे, अंनिसच्या कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याविषयीची कागदपत्रे, अशी माहितीही या निवेदनासमवेत देण्यात आली.
श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. श्रवण जाधव यांनी कालिदास नाट्यगृहाचे व्यवस्थापन पहाणारे ज्ञानेश्वर काळे यांची भेट घेऊन त्यांना अंनिसच्या वादग्रस्त प्रकारांविषयीची माहिती दिली. त्यावर काळे यांनी याप्रकरणी लक्ष घालतोे, असे सांगितले.
अयोग्य वक्तव्य केल्यास अंनिसवर कारवाई करू ! – रवि सरदेसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे
कोणत्याही प्रकारे वादग्रस्त विधान करण्यात येऊ नये, यासाठी अंनिसला आधीच सूचना दिल्या आहेत. त्यांनी काही अयोग्य वक्तव्य केल्यास त्वरित पोलिसांना सांगा. आम्ही कारवाई करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात