Menu Close

रत्नागिरी : राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आदेश

रत्नागिरी येथील राष्ट्रध्वज सन्मान बैठकीत राष्ट्रप्रेमी संघटनांचा सहभाग

रत्नागिरी :  १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि विविध शासकीय अधिकारी यांच्यासमवेत विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या सहभागाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत विविध माध्यमांद्वारे जनजागृती आणि राष्ट्रध्वजाचा अवमान टाळणे यांविषयी शासकीय आदेशांची कठोरतेने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांना दिले.

राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी नुकतेच जिल्हाधिकार्‍यांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीच्या प्रारंभी या निवेदनाचा उल्लेख करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी तुम्ही दिलेल्या सूचना चांगल्या आणि स्वीकार करण्याजोग्या आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करत आहात. त्या अनुषंगाने आजची बैठक बोलावण्यात आली आहे.

यानंतर त्यांनी उपस्थित राष्ट्रप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. राष्ट्रध्वज सन्मान मोहिमेअंतर्गत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, विद्यार्थ्यांसाठी प्रवचने, केबल प्रक्षेपण, होर्डिंग इत्यादी माध्यमांद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वश्री प्रसाद म्हैसकर आणि संजय जोशी यांनी दिली.

शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर यांनी शाळा-महाविद्यालये यांमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशी सूचना केली. यानंतर जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शासकीय अधिकार्‍यांना आदेश दिले.

जिल्हाधिकारी यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिलेले आदेश

१. तालुक्याच्या ठिकाणी शहरांमधून रिक्शाद्वारे जनजागृती करावी, शहरात प्रशासनाकडून होर्डिंग्ज लावावीत, अशा सूचना त्यांनी जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना दिल्या.

२. शाळा आणि महाविद्यालये यांमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे आणि तसे परिपत्रक काढावे, असे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सांगितले.

३. माहिती कार्यालयाने वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्धी करावी.

४. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री आणि वापर यांवरील बंदीची कठोरतेने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.

या बैठकीनंतर राष्ट्रध्वजाचा मान राखा ही हिंदु जनजागृती समिती प्रस्तुत आणि सनातन संस्था-निर्मित ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्ता भडकवाड, तहसीलदार श्री. राजेंद्र बिर्जे, पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. देविदास कुल्हाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वाघमोडे, रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत ठोंबरे, राजापूरचे मुख्याधिकारी श्री. देवानंद ढेकळे, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री राकेश नलावडे, सुशील कदम, हिंदु राष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष श्री. सागर कदम, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री. श्रीराम नाखरेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी, सनातन संस्थेचे श्री. प्रसाद म्हैसकर आदी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *