सोलापूर येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर उत्साहात
सोलापूर : हिंदु धर्मातील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्र आहे. ते विसरून अनेक लोक व्हॉट्सअॅप, फेसबूक या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये गुरफटलेले आहेत. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे श्री गणेशाचा नामजप करत गणेशोत्सव साजरा करावा. प्रत्येक उत्सवाचा आनंद घ्यायला हवा. प्रत्येक उत्सवातून धर्मरक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन दुर्गा भवानी प्रतिष्ठानचे श्री. विजय महिंद्रकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बोमड्याल शाळेसमोरील श्री गणेश मंदिर येथे आयोजित सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि श्री. दत्तात्रय पिसे हेही उपस्थित होते. या शिबिरात येथील विविध उत्सव मंडळांचे ६५ प्रमुख आणि सदस्य सहभागी झाले होते.
या वेळी हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राविषयी जागृती करणारे सार्वजनिक उत्सव असायला हवेत ! या विषयावर श्री. दत्तात्रय पिसे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श ही ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली, तसेच गटचर्चेच्या माध्यमातून आपापल्या गणेशोत्सव मंडळामध्ये राष्ट्र अणि धर्म विषयी कोणकोणते उपक्रम राबवू शकतो यांविषयी चर्चा करण्यात आली.
मनोरंजनात्मक कार्यक्रमांपेक्षा राष्ट्र-धर्म यांविषयी जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करा ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्यावर ईश्वराची कृपा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. समाजामध्ये धर्माविषयी जागृती निर्माण होईल, या दृष्टीने गणेशोत्सवाकडे पहायला हवे. उत्सवांमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित न करता राष्ट्र-धर्म यांविषयी जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करायला हवेत. आपल्या आणि अन्य मंडळांतील कार्यकर्त्यांना धार्मिक उत्सवांत देवतांच्या नावाने होणार्या अयोग्य कृतींपासून परावृत्त करा.
गणेशोत्सवासाठी वर्गणी मागतांना कोणावरही बळजोरी करू नका ! – रमेश श्रावण, सिद्धेश्वर तरुण मंडळ
गणेशोत्सवात वर्गणी गोळा करण्यापासून ते विसर्जनापर्यंत युवक धिंगाणा घालतात. वर्गणी मागतांना कोणावरही बळजोरी करू नका. उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करा. या शिबिरात उपस्थित राहून मला चांगले वाटले.
क्षणचित्र
शिबिराच्या कालावधीत पाऊस पडत असूनही त्याची तमा न बाळगता मंडळांचे कार्यकर्ते शिबिरात सहभागी झाले होते.
शिबिरार्थींच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
१. श्री. तुलसीदास चिंताकिंदी : शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर मन पूर्णपणे शांत झाले. गणेशमूर्तींचे विसर्जन योग्य प्रकारे करायला हवे, हे लक्षात आले.
२. श्री. नितीन वइटला : येथे आल्यानंतर मंदिरात आल्यासारखेच वाटत आहे. मन तणावमुक्त झाले. धर्मासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली.
३. एक धर्मप्रेमी : वडीलही एवढे चांगले मार्गदर्शन करणार नाहीत, तेवढे ज्ञान तुम्ही दिले ! हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. आपण सर्वजण या कार्यामध्ये सहभागी होऊया.