मुंबई : वय वर्षे अवघे साडेसतरा. आई-वडील व तीन भावंडांसोबत राहणारी ‘ती’ काही भेटींनंतर एका विवाहित पुरुषाच्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. त्याच्याकडून मिळणाऱ्या मोबाइल फोन्सद्वारे सातत्याने संपर्कात राहू लागली आणि एक दिवस अचानक घर सोडून पळून गेली. पोलिस तक्रार करूनही काहीच न झाल्याने हवालदिल झालेल्या आई-वडिलांना अखेर मुंबई हायकोर्टाचाच आधार मिळाला आणि वयात आलेली मुलगी समुपदेशानंतर अखेर पुन्हा त्यांच्या हाती आली.
‘लव्ह जिहाद’च्या संकल्पनेबाबत राजकीय स्तरावर वाद झडत आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वी असाच काहीसा प्रकार सांताक्रूझ परिसरात घडला. यासंदर्भातील याचिकेनुसार, येथील एका कॉलेजमध्ये अकरावीत शिकणारी प्रीती शर्मा (नाव बदलले आहे) हिची इम्रान नासीर खान उर्फ टुट्टू (२९) याच्याशी ओळख झाली. आधीच दोन विवाह झालेल्या आणि जवळपास १२ गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या इम्रानने प्रितीशी लगट वाढवली. मग तिच्या कायम संपर्कात राहता यावे म्हणून त्याने तिला मोबाइल दिला. कपड्यांच्या विक्रीचा फेरीवाल्याचा व्यवसाय करणाऱ्या तिच्या गरीब वडिलांनी त्याविषयी विचारणा केली असता तो इम्रानने दिल्याचे तिने सांगितले. त्यामुळे त्यांनी लगेच इम्रानला फोन करून दम भरला. त्यावेळी त्याच्या पत्नीनेही आपला पती पुन्हा असे करणार नाही, अशी हमी दिली. त्यावेळी वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला खरा, पण तो काही काळच ठरला. कारण त्याने पुन्हा तिला नवा मोबाइल देऊन तिच्याशी संपर्क प्रस्थापित केला. शिवाय तिला इस्लाम धर्माची काही पुस्तकेही दिली. आई-वडिलांनी खूप प्रीतीने त्याचा नाद सोडला नाही. म्हणून वडिलांनी तिचे कॉलेजला जाणे बंद केले. पोलिसांत तक्रार देण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे प्रीतीचा भाऊ विकासने इम्रानला दम भरला. पण इम्रानने नंतर मित्रांच्या मदतीने त्याच्यावरच जीवघेणा हल्ला केला. ६ फेब्रुवारीला आई व बहिणीचा डोळा चुकवून प्रिती पळून गेली. त्यामुळे वडिलांनी इम्रानविरुद्ध अपहरणाची फिर्याद नोंदवली. तसेच तिचे धर्मांतर करून आपल्यापासून कायमची दुरावण्याचा प्रयत्न असल्याची भीती व्यक्त केली. मात्र, सर्व तपशील देऊनही पोलिसांनी तपास न केल्याने अखेर जुलैमध्ये त्यांनी हायकोर्टात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका केली.
त्यावर कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलिसांची सूत्रे हलली. दोघांच्या शोधासाठी उत्तर प्रदेशातील अलाहाबादपर्यंत पोलिस पथक गेले. त्यानंतर प्रीतीला कोर्टात हजर करण्यात आले. अखेर कोर्टाच्या आदेशानुसार, ‘स्नेह’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रीतीचे समुपदेशन झाल्यानंतर ती पुन्हा आई-वडिलांसोबत राहू लागली. त्यामुळे तसे नमूद करत न्या. रणजित मोरे व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने ही याचिका नुकतीच निकाली काढली.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स