हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ
जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयीचे निवेदन यावल येथील पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आणि नायब तहसीलदार आर्.बी. माळी यांना सादर करण्यात आले. असेच निवेदन भुसावळ येथील पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, कोटेचा हायस्कूल, के नारखेडे हायस्कूल, भुसावळ हायस्कूल, चोपडा येथील बालमोहन विद्यालय, प्रताप विद्यामंदिर, कस्तुरबा विद्यालय आणि पाळधी येथील ३ शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता; मात्र दुर्दैवाने याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशीच बहुतांश भारतियांना होते. या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र कागदी किंवा प्लाास्टिकचे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळी रस्त्यावर पडलेले दिसतात. त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते. अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लाास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत. नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘प्लाास्टिक बंदी’च्या निर्णयामुळेही प्लाास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे, हे कायद्याच्या कचाट्यात येते.
निवेदन देतांना यावल येथे सर्वश्री धीरज भोळे, विनोद पाटील, राहुल कोळी, राहुल भालेराव, अजय नेवे, धनराज कोळी, विक्की चौधरी, चेतन भोईटे, तर भुसावळ येथे सर्वश्री उमेश जोशी, भूषण महाजन, पियुष महाजन, प्रवीण भोई, संजय भोई, गोलू भोई आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्र – भुसावळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हितेंद्र धांडे यांनी स्वतः ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयीचे भित्तीपत्रक समितीच्या कार्यकर्त्यांकडून मागून घेतले.