Menu Close

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

लोकहो, भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा !

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत अती प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले आहेत, तर कोट्यवधी रुपयांची हानीही झाली आहे. पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत आणि त्या आपापल्या परीने सर्व साहाय्य करत आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचाही मोठा सहभाग आहे. या संघटनांकडून अन्नदान, धान्य, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंसह औषधे आणि अन्य वैद्यकीय साहाय्यही केले जात आहे. या साहाय्यासह सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून पूरग्रस्तांना साधना, तसेच नामजप यांचेही महत्त्व सांगण्यात येत आहे.

अंकलखोप (जिल्हा सांगली) येथे जीवनावश्यक वस्तू आणि औषध यांचे वाटप

अंकलखोप (जिल्हा सांगली) : ११ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंकलखोप (जिल्हा सांगली) गावातील सूर्यवंशी मळ्यात पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. मदन सावंत आणि श्री. अनिल कडणे, सनातन संस्थेचे श्री. सुरेंद्र भस्मे, श्री. रवि घाडगे, कराडमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. रवि साठे आणि संतोष सरंदकर उपस्थित होते.

या वेळी पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ, कांदा, बटाटा, चटणी, तेल, गव्हाचे पीठ, काडेपेटी, बिस्कीटे, कपडे, साखर, चहा पावडर, टॉवेल-टोपी, चटई, साड्या, लहान मुलांचे कपडे अशा जीवनावश्यक साहित्यांसह औषधेही देण्यात आली. आष्टा येथील न्यू इंग्लिश गल्सर् स्कूल येथील पूरग्रस्तांनाही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

चावरे (हातकणंगले) येथे केलेे अन्नदान

चावरे या ठिकाणी उपस्थित सनातन संस्थेच्या १. आधुनिक वैद्या (सौ.) शरदिनी कोरे, २. आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे, तसेच अन्य

चावरे (हातकणंगले) : ११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शरदिनी कोरे आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. या वेळी चावरे गावातील श्री. शिवाजी गुरुप, उपसरपंच श्री. भगवान पाटील, पोलीस पाटील श्री. दिलीप घोडके हेही उपस्थित होते.

या ठिकाणी ४०० हून अधिक पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक आणि अन्य ठिकाणांहूनही साहाय्याचा ओघ चालू आहे.

दिग्गेवाडी (कर्नाटक) गावामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांना साहाय्य वितरीत

कर्नाटकातील रायबाग येथील दिग्गेवाडी गावामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना साहाय्य केले. तसेच रायबाग येथे आर्.आर्. ग्रुप आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी समाजातून नित्योपयोगी वस्तू आणि राशन गोळा करून गंजी गावातील पूरग्रस्तांना वितरित केले.

धारवाड (कर्नाटक) जिल्ह्यातील गदग येथे पूरग्रस्तांना भोेजन आणि कपडे वाटप

धारवाड जिल्ह्यातील गदग येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी आणि सनातनचे साधक यांनी मलाप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे पीडित होळेअल्लूर गावातील पूरग्रस्तांना तांदूळ, भोजन आणि कपडे गोळा करून दिले. या समवेतच गदग येथील सनातनच्या साधिका सौ. मंगला बेलारी यांचे पती श्री. मंजुनाथ बेलारी यांनी गदगपासून ३५ किमी लांब असलेल्या कोन्नूर येथील पूरग्रस्तांना अन्न आणि कपडे वितरित केले. गोकाक येथे सनातनच्या साधिकांनी पूरग्रस्त नागरिकांसाठी दुकानांमधून नित्योपयोगी वस्तू गोळा करून वितरित केल्या.

रायबाग (कर्नाटक) येथील धर्मप्रेमींकडून पूरग्रस्तांना जेवण आणि कपडे यांचे वाटप

पूरग्रस्तांना जेवण आणि कपडे यांचे वाटप करतांना धर्मप्रेमी

कर्नाटकातील रायबाग येथील बावची गावातील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी जेवण आणि कपडे यांचे वाटप करून साहाय्य केले. या वेळी पतंजली योगपिठाचे श्री. जयानंद हिरेमठ, धर्मप्रेमी श्री. विनोद कलगे यांच्यासह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

कोल्हापूर येथे कपडे आणि धान्य यांचे वर्गीकरण

जुना बुधवार पेठेतील नागरिक आणि सोल्जर ग्रुप यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अर्पण आलेले कपडे, धान्य आदी वस्तूंचे वर्गीकरण श्री शाहू प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक १४ येथे काही दिवसांपासून करण्यात आले. यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी आणि सौ. जान्हवी अमोल कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. विश्‍वनाथ पंडित यांनीही दोन दिवस उत्स्फूर्तपणे या कार्यात सहभाग घेतला.

बेळगावमध्ये पिण्याचे पाणी पोचवण्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

बेळगाव येथे पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी घेऊन जातांना श्री. विजय नंदगडकर, तसेच अन्य

बेळगाव : बेळगावमध्ये सतत पडणार्‍या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा वसाहत आणि टिळकवाडी येथील सदनिकांमध्ये अडकलेल्यांना पिण्याचे पाणी पोचवण्याच्या कार्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय नंदगडकर, तसेच श्री. लक्ष्मण बेळगावकर सहभागी झाले होते.

नवीन इंगळी (कोल्हापूर) या वसाहतीमधील पूरग्रस्तांना साहाय्य करतांना आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर : १० ऑगस्टला नवीन इंगळी या वसाहतीमधील ८० पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साहाय्य करण्यात आले. या पूरग्रस्तांना भोजनाची पाकिटे घरोघरी जाऊन देण्यात आली. यात सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, किरण दुसे, सागर हंकारे, प्रथमेश गावडे यांसह धर्मप्रेमी श्री. राजाराम माने आणि श्री. उमेश उपस्थित होते. या वेळी इंगळी गावातील २०० पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. या पूरग्रस्तांना समितीच्या वतीने साधनेचे महत्त्व, तसेच नामजपाचे महत्त्व सांगण्यात आले. या वेळी काही पूरग्रस्तांनी शंकानिरसनही करून घेतले.

कोल्हापूर येथे पाण्यात अडकलेल्या १४ लोकांची हिंदु जनजागृती समितीचे संतोष सणगर यांनी केली सुटका

तुम्ही देवासारखे धावून आलात ! – पूरग्रस्तांनी व्यक्त केले आभार

हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर आणि अन्य एक सहकारी श्री. जोतिराम शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या इमारतीत तळ मजल्यावर ५ फूटापर्यंत पाणी साचलेले होते. तेव्हा वरील मजल्यावरील सदनिकांमधील १४ लोकांना इमारतीच्या बाहेर काढले. तेव्हा लोकांनी तुम्ही देवासारखे धावून आलात अन्यथा आमचे खरे नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सांगली येथे आरोग्य साहाय्यता समितीच्या वतीने पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी

सांगली येथे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करतांना आरोग्य साहाय्यता समितीचे कार्यकर्ते

सांगली : हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत आरोग्य साहाय्यता समितीच्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी विश्रामबाग येथील सावरकर प्रतिष्ठान, तसेच शंभरफुटी रस्ता येथे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि औषधेही देण्यात आली. ही तपासणी आधुनिक वैद्य श्रीमती मृणालिनी भोसले यांनी केली. या सेवाकार्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीश पुजारी, श्री. संतोष देसाई, श्री. अक्षय थोरात आणि सनातनच्या सौ. कल्पना थोरात सहभागी झाले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *