स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी जनजागृती करावी ! : जळगाव येथील अपर जिल्हादंडाधिकार्यांकडून कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना सूचना
हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा परिणाम !
जळगाव : प्रतिवर्षी २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट या दिवशी, तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या कागदी अन् प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर फाटलेले आणि खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले आढळतात. त्यातून राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या अन् प्रसारमाध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी जनजागृती करावी, अशा सूचना येथील अपर जिल्हादंडाधिकारी श्री. वामन कदम यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.
त्यांनी पुढे म्हटले आहे, प्लास्टिकचे विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. ध्वजसंहितेनुसार तसेच केंद्र शासनाकडील गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापराविषयी मान्यता नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्लास्टिकचे ध्वज उत्पादित करणारे उत्पादक आणि वितरक यांच्यावर बंदी आणावी. प्लास्टिकच्या ध्वजांच्या विक्रीस प्रतिबंध करावा आणि उल्लंघन करणार्यांवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथील जिल्हाधिकार्यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी याविषयी आम्ही त्वरित कृती करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरच अपर जिल्हादंडाधिकार्यांकडून वरील सूचना देण्यात आल्या.