कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी (तालुका हातकणंगले) गावातून विस्थापित झालेल्यांना भोजन आणि वैद्यकीय साहाय्य !
कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट या दिवशी इंगळी गावातून विस्थापित झालेल्या नागरिकांना साहाय्य पुरवण्यात आले. यात इंगळी माळभाग आणि रामनगर या ठिकाणी भोजनाची २०० पाकिटे देण्यात आली, तसेच २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी तपासणी करून औषधे देण्यात आली. ही तपासणी सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी केली.
या सेवाकार्यात हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, संतोष सणगर, प्रथमेश गावडे यांसह धर्मप्रेमी श्री. उमेश येळवडे आणि श्री. महेश येळवडे यांचाही सक्रीय सहभाग होता.
इंगळी पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ आरोग्य शिबिरांचे आयोजन
१२ ऑगस्ट या दिवशी इंगळी गावातील शिरोळे मळा येथील श्री. दत्ता शिरोळे यांच्या घरी, रामनगर या भागात, माळभाग येथील राजाराम माने यांच्या घरी, तसेच अन्य एक ठिकाणी, अशा चार ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पूरग्रस्तांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. याचा लाभ २५० हून अधिक पूरग्रस्तांनी घेतला. ही तपासणी करण्यात कागल येथील डॉ. आशुतोष विभुते आणि डॉ. मुकुंद सादिगले यांचे सहकार्य लाभले. या सेवेत हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, संतोष सणगर आणि प्रथमेश गावडे सहभागी होते.
समितीच्या पुढाकाराने गुरांच्या डॉक्टरांकडून ५०० हून अधिक गुरांची तपासणी
इंगळी या गावात गुरांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची आवश्यकता होती. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीने शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुरांचे डॉ. दीपक सोलनकर यांना या सेवेसाठी जोडून दिले. डॉ. दीपक सोलनकर यांनी तेथील ५०० हून अधिक गुरांची विनामूल्य तपासणी केली.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पलूस तालुक्यात पूरग्रस्तांना साहाय्य
तासगाव : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी येथील धनगाव येथून आलेले पूरग्रस्त, निमणी येथे माळवाडी येथून आलेले पूरग्रस्त, बुर्ली गाव आणि चौगुले वस्ती येथील पूरग्रस्त अशा ७०० हून अधिक पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने साहाय्य करण्यात आले. या पूरग्रस्तांना बिस्कीट पुडे, भडंग, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. यात सर्वश्री शंकर राजमाने, दीपक घोडके, राजेंद्र माळी, किरण पोळ, तसेच धर्मप्रेमी सर्वश्री अजित पाटील, संतोष पाटील, शंकर पाटील, भगवान गुरव, शशीकांत कोळी आणि सौ. अनिता कोळी यांसह अन्य कार्यकर्ते अन् साधक यांचा सहभाग होता.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी नि:स्वार्थीपणे केलेले साहाय्य कौतुकास्पद ! – विकास खोत
इंगळी हे गाव अनुमाने ८ सहस्र लोकांचे असून हे गाव १०० टक्के पूरग्रस्त झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक येथे पोचण्यापूर्वी अन्य कोणाकडून तेथे अपेक्षित साहाय्य पोचले नसल्याचे पूरग्रस्तांकडून समजले. हिंदु जनजागृती समितीने ९, १०, ११ आणि १२ ऑगस्ट असे चार दिवस साहाय्यता अभियान राबवले. हे साहाय्य केल्याविषयी पूरग्रस्तांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आणि आभार मानण्यात आले. हे अभियान राबवल्यावर येथील पूरग्रस्त श्री. विकास खोत म्हणाले, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्या कार्याविषयी आम्ही केवळ ऐकून होतो. पूरग्रस्तांना तुम्ही केलेले साहाय्य कौतुकास्पद आहे.