चलवेनहट्टी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा
बेळगाव : सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार करा, असे आव्हान श्री. मनोज खाडये यांनी येथील चलवेनहट्टी येथे आयोजित केलेल्या सभेत केले. १३ मार्च २०१६ या दिवशी झालेल्या बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन चलवेनहट्टी येथील धर्माभिमानी युवकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत श्री. खाडये बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे याही उपस्थित होत्या.
चलवेनहट्टी या गावातील धर्माभिमानी युवकांनी सभेचे दायित्व घेऊन केवळ ४ दिवसांत प्रसार करून ६५० हून अधिक धर्माभिमान्यांना सभेसाठी एकत्रित केले. सभेची सर्व व्यवस्था याच युवकांनी पुढाकार घेऊन केली. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांचा सत्कार सौ. अनिता पाटील यांनी केला. या नंतर श्री. मनोज खाड्ये यांचा सत्कार श्री. विनोद पाटील यांनी केला. आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी धर्मांतर, गो-हत्या, ‘लव्ह जिहाद’ या धर्मावरील संकटांविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच धर्मशास्त्राचे महत्त्वही विशद केले. चलवेनहट्टी हे गाव आदर्श करून धर्मबंधुत्व निर्माण करण्यासाठी बालसंस्कारवर्ग, धर्मशिक्षणवर्ग यांविषयीचे महत्त्वही सभेत सांगण्यात आले. वक्ते करत असलेल्या आवाहनांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेला विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करणार्या धर्माभिमान्यांचे आभार मानण्यात आले.
क्षणचित्रे
१. सभेच्या पूर्वसिद्धतेच्या वेळी आलेल्या वादळामुळे कनात बांधलेले खांब उन्मळून पडले. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. गजानन कारेकर यांनी धर्माभिमान्यांना एकत्रित प्रार्थना करायला सांगितली. त्यानंतर २ मिनिटांतच वादळ शांत होऊन पुढील सेवा करता आली. या वेळी देवाने अनुभूती दिल्याचे सर्वांनी सांगितले.
२. सभास्थळापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला; मात्र सभेच्या ठिकाणी पाऊस पडला नाही.
३. सभेसाठी वापरण्यात आलेले विद्युत जनित्र वक्त्यांच्या भाषणांनंतर बंद पडले. या काही घटनांमुळे ही सभा श्रीकृष्णच पार पाडत असल्याची जाणीव उपस्थितांमध्ये निर्माण झाली.
४. सभेनंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला ७० हून अधिक धर्माभिमानी रात्री उशिरापर्यंत थांबले होते. या सभेतून प्रेरणा घेऊन हदीगनूर या शेजारील गावातील धर्माभिमानी युवकांनीही सभेचे आयोजन करण्याची वक्त्यांकडे विनंती केली.
५. चलवेनहट्टी गावातील एक धर्माभिमानी श्री. नीलेश पाटील यांच्या उजव्या हाताचा दोन दिवसांपूर्वी अस्थिभंग होऊनही त्यांनी संपूर्ण ध्वनीक्षेपण यंत्रणा आणि विद्युत यंत्रणा सांभाळली.
विशेष
१. चलवेनहट्टी या गावाची लोकसंख्या साधारणतः २ सहस्र आहे. असे असतांना ६५० हून अधिक हिंदू धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित होते. यावरून लोकांचा हिंदु जनजागृती समितीवरील विश्वास दिसून येतो.
२.या सभेत कु. निखिला कलघटगी, कु. संस्कृती गावडे, कु. अमोल बिलावर, कु. गौरव कारेकर, कु. शिवानंद सावंत या बालसाधकांनी सनातन वस्तू-विक्री केंद्रावर (धर्मरथावर) सेवा केली. या बालकांची सेवा करण्याची वृत्ती पाहून अनेक जिज्ञासूंनी त्यांचे कौतुक केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात