नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबन याने हिंदू मुलीशी विवाह केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शबन आणि या मुलीचे प्रेमसंबंध होते. विवाहाआधी या मुलीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे.
शबन आणि या मुलीचा विवाह रविवारी संध्याकाळी जामा मशिदीत पार पडला. विवाहाला बुखारी आणि वधुपक्षाचे मोजकेच नातेवाईक उपस्थित होते, असे वृत्त ‘दैनिक जागरण’ने दिले आहे. शबन हा अवघा २० वर्षांचा असून गेल्या २२ नोव्हेंबर रोजी एका भव्य सोहळ्यात जामा मशिदीचे नायब इमामपदाचा मान त्यांना देण्यात आला आहे. अॅमिटी विद्यापीठातून समाजशास्त्राचा पदवीधर असलेल्या शबनचे हिंदू मुलीशी असलेले प्रेमसंबंध मधल्या काळात फार चर्चेत आले. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही मुलगी आणि शबनने आधीच विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला इमाम बुखारी यांचा या विवाहाला विरोध होता. पण नंतर बुखारी या विवाहाला राजी झाले. या मुलीने इस्लामचा स्वीकार करण्याचे मान्य केल्याने विवाहातील अडसर दूर झाला.
या मुलीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या बातम्याही मधल्या काळात पसरल्या होत्या. मात्र बुखारी यांनी मला बदनाम करण्यासाठी हे षढयंत्र रचलं जात असल्याचा आरोप करत हे वृत्त फेटाळले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात या मुलीने इस्लामचा स्वीकार केला. त्यानंतर विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर हा विवाह पार पडले असे सांगितले जात होते. दोन्ही कुटुंबांची संमती झाल्याने विवाह धुमधडाक्यात करण्याचा बेत होता मात्र रविवारी अगदी साधेपणाने हा विवाहसोहळा पार पडला.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स