हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : राज्य शासनाने प्लास्टिकबंदीचा कायदा केला आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री अथवा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. असे केल्यास दंडात्मक कार्यवाहीची सिद्धताही महापालिकेने केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ ऑगस्ट या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले होते. पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी हे आवाहन करतांना म्हटले आहे, राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध १९७१ च्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान केल्यास तो फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान करावा. प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.