चिखली : येथे पुराने प्रभावित झालेल्या गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, चादरी आदी जीवनावश्यक वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी गरजूंना मेणबत्त्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. एस्.आर्. पाटील, भाजपचे श्री. संभाजी पाटील, श्री. किरण पाटील, तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या सेवाकार्यात धर्मप्रेमी सर्वश्री रामभाऊ मेथे, विक्रम माने, सिद्धार्थ पाटील, ऋषभ मोहिते यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. अमोल कुलकर्णी सहभागी झाले होते.
इंगळी : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंगळी (गावभाग) येथील ग्रामपंचायतीच्या समोरील ‘अमृत मंथन’च्या सभागृहात पूरग्रस्तांसाठी आरोग्य तपासणी आणि विनामूल्य औषध शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आशुतोष विभुते आणि डॉ. मुकुंद सादिगले यांनी पूरग्रस्तांची तपासणी केली अन् प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेने या वेळी साहाय्य केले. याचा लाभ ५० हून अधिक पूरग्रस्तांनी घेतला. या शिबिराच्या आयोजनात धर्मप्रेमी श्री. स्वप्नील पाटील यांचे सहकार्य लाभले. १५ ऑगस्ट या दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांसह हुपरी येथील शिवसेनेचे श्री. भरत मेथे, श्री. विजय जाधव, इंगळी येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. केशव पाटील, श्री. उमेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.
१. शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांनी समितीने आयोजित केलेल्या शिबिराचे कौतुक करून स्थानिक शिवसैनिकांना समितीच्या कार्यकर्त्यांना लागेल ते साहाय्य करण्याच्या सूचना केल्या.
२. या शिबिराचा पोलीस, तेथे सेवेसाठी असलेले अन्य संस्थांचे कार्यकर्ते यांनीही लाभ घेतला. या वेळी पोलिसांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून अशा कार्याची समाजाला आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी
सांगली : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ ऑगस्टला सांगलीवाडी येथे पूरग्रस्तांची तपासणी करून त्यांना विनामूल्य औषधे देण्यात आली. ही तपासणी आधुनिक वैद्य अमित भोसले यांनी केली. याचा लाभ ५३ पूरग्रस्तांनी घेतला. या सेवाकार्यात समितीचे सौ. तनुजा पडियार, कु. ऐश्वर्या वांडरे, श्री. कोठावळे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.