हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृतीशील पाऊल उचलणार्या ध्वजविक्रेत्यांचे अभिनंदन !
यवतमाळ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समितीच्या वतीने मागील वर्षी केलेल्या प्रबोधनामुळे यंदा जिल्ह्यातील १० ठोक ध्वजविक्रेत्यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करण्याचे टाळले. यंदा मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यात पोलीस प्रशासनास ७ ठिकाणी, तर ३२ शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. हस्तपत्रके आणि भित्तीपत्रके यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. ४ शाळांमध्ये विषय मांडण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले. यासह राष्ट्र-धर्म विषयीच्या ग्रंथांचे प्रदर्शन आणि क्रांतीकारकांविषयीचे फलक प्रदर्शन लावण्याची मागणीही करण्यात आली.