आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन करण्याचा निर्णय
मुंबई : मुंबई येथे भांडुप, मालाड, तर नवी मुंबई येथे खारघर आणि कोपरखैरणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या शिबिरांमध्ये समितीकडून ‘गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श’, ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या बैठकीमध्ये गणेशोत्सवांतील अनुचित प्रकारांविषयी प्रबोधन करून आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात येईल, याविषयी चर्चा करण्यात आली. प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याचा निश्चय गणेशोत्सवाच्या प्रतिनिधींनी या वेळी केला.
खारघर, नवी मुंबई
येथील ‘सेक्टर ५’च्या श्री गणेश-औदुंबर मंदिराच्या प्रांगणात ११ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५ गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
स्वराज्यातून सुराज्यात जाण्यासाठी प्रबोधन, हेच गणेशोत्सवाचे ध्येय हवे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सार्वजनिक गणेशोत्सवांच्या माध्यमातून जनजागृती करत लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य मिळवून दिले; पण या स्वराज्याला आज सुराज्यात नेण्याची आवश्यकता आहे. यासाठी धर्माचे अधिष्ठान हवे. गणेशोत्सव मंडळांनी असे ध्येय ठेवून कार्य केल्यास कुटुंब, समाज, धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण होऊन स्वराज्याचे सुराज्य होईल.
भांडुप
भांडुप (प.) येथील बीपीएस् शाळेसमोरील बैंगणपाडा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सभागृहात ११ ऑगस्ट या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवतरुण सामाजिक मित्र मंडळ, सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मराठा मित्रमंडळ, बैंगणपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ आदी गणेशोत्सव मंडळांचे १६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी ‘गणेशोत्सव मंडळांनी ईश्वरी राज्याच्या उभारणीसाठी योगदान द्यावे’, असे आवाहन केले. तसेच ‘सार्वजनिक उत्सव आदर्श पद्धतीने कसे साजरे करावेत ?’ या विषयी समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन करण्यासाठी बैंगणपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उत्सव शास्त्रोक्तपणे होण्यासह या माध्यमातून धर्मसेवा होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया ! – अधिवक्ता संतोष महामुनी
धर्माचे विडंबन हे पाप आहे. शास्त्र समजून कृती केल्यावर योग्य काय आहे, ते आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोचणार आहे. हिंदु धर्मात प्रत्येक गोष्टीचे शास्त्र सांगण्यात आले आहे. त्याविषयी अभ्यास करून ते अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचेल, या दृष्टीने वाटचाल करूया. गणेशोत्सव मंडळांकडे संघटन आहे, हीच मोठी शक्ती आहे. या माध्यमातून उत्सव शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी, तसेच त्या माध्यमातून व्यापकपणे धर्मसेवा होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया, असे प्रतिपादन अधिवक्ता संतोष महामुनी यांनी केले.
शिबिरार्थींच्या प्रतिक्रिया
१. श्री. संतोष वैद्य, अध्यक्ष, नवतरुण सामाजिक मित्र मंडळ : शिबिरात विविध सूत्रांवर उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. याची आज आवश्यकता आहे.
२. श्री. रोहित आजगावकर, सदस्य, सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : आपल्या धर्मातील लोप पावत चाललेल्या गोष्टींविषयी समाजात प्रबोधन केले पाहिजे.
३. श्री. चंद्रकांत झगडे, सहखजिनदार, बैंगणपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ : शिबिरातून पुष्कळ नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आहेत. शिबिरात उत्साह वाटत होता. मंडळात नवीन उपक्रम राबवण्याची संकल्पना अप्रतिम आहे.
कोपरखैरणे, नवी मुंबई
कोपरखैरणे गावचे माजी सरपंच ह.भ.प. मोरेश्वर पाटील यांनी शिबिरासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. त्यांनी ‘सनातनचे कार्य मला आवडते’ असेही सांगितले. या वेळी आलेल्या जिज्ञासूंनी प्रश्न विचारून स्वत:च्या शंकांचे निरसन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी मार्गदर्शन केले.
क्षणचित्र : या वेळी ऐरोली येथील धर्मप्रेमी श्री. संदीप मांडवकर यांनी ‘शिबिरात लावलेल्या सनातनच्या उदबत्तीच्या सुगंधाने माझे मन प्रसन्न झाले. आमच्या गणेशोत्सव मंडळात तुम्ही मार्गदर्शन करण्यास नक्की या. आम्ही फलकांचा (बॅनर्स) खर्च करू’, असे सांगितले.