नंदुरबार : येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी भाजपचे श्री. विजय चौधरी, शहराध्यक्ष श्री. मोहन खानवानी, विश्व हिंदू परिषदेचे श्री. रवींद्र पवार, शिवसेनेचे डॉ. विक्रांत मोरे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी १५ दिवसांपासून बैठका घेत प्रयत्न केले. होळीच्या वेळेस दोन दिवस दंगल झाली होती. त्याचा तणाव असल्यामुळे प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशीही पोलीस प्रशासनाने अनुमती दिलेली नव्हती; पण शोभायात्रा काढायचीच, या जिद्दीवर मंडळांनी प्रयत्न केले.
विजय चौधरी यांनी बाजू लावून धरली. त्यामुळे २६ मार्च या दिवशी सकाळी ११ नंतर पोलिसांनी मिरवणुकीला अनुमती दिली. अनुमाने २५ हून अधिक व्यायामशाळा, मंडळे, संघटना आणि संस्था यांनी एकत्र येत येथे विराट शोभायात्रा काढली. भगवे ध्वज घेवून नाचणारे सहस्रो युवक, शिवछत्रपतींची मूर्ती घेऊन मिरवणुकीत चालणारी २५ हून अधिक वाहने, सतत दुमदुमणार्या घोषणा यांमुळे शहरातील रस्ते भारावून गेले होते. नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी झाली.
चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. काही जणांच्या मते वारंवार होणार्या जातीय दंगली आणि उद्भवणारे जातीय तणाव यांमुळे नंदुरबारमध्ये मोठे वैचारिक ध्रुवीकरण होत असल्यानेच शिवप्रेमी प्रथमच अधिक प्रमाणात संघटित झाले आहेत, अशी मतेही काहींनी मांडली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात