रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. याच शुभदिनाचे औचित्य लक्षात घेऊन हिंदुत्वाचे कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये अशी बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी, या हेतूने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध शहरांतील हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, संपादक, पत्रकार, हितचिंतक, पोलीस अधिकारी आदींना राखी बांधण्यात आली. या मोहिमेचा यवतमाळ, धुळे, रायगड आणि अमरावती या जिल्ह्यांचा संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
यवतमाळ
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिल्ह्यात यवतमाळ, वणी, कारंजा, नेर या ठिकाणी रक्षाबंधन मोहीम घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांच्यासह ३ तहसीलदार, २ ठाणेदार, वृत्तपत्र क्षेत्रातील १० मान्यवर, ९ हितचिंतक, तसेच ४ राजकीय पक्षांतील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्यात आली. या वेळी जिल्हाधिकार्यांसमवेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेविषयी चर्चा करण्यात आली.
– या वेळी हितचिंतकांनी दिलेल्या प्रतिक्रिया –
१. तुमचे उपक्रम पुष्कळ चांगले असतात. – श्री. अमोल पवार, तहसीलदार, नेर.
२. सनातन संस्थेला नेहमी आमचे सहकार्य राहील. – श्री. पिंटू बांगर, शिवसेना शहरप्रमुख, यवतमाळ.
रायगड
हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना सौ. मोहिनी मांढरे यांनी राखी बांधली. १५ ऑगस्ट या दिवशी सतीश गायकवाड यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले आहे. त्यासाठीही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना या वेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
कर्जत पोलीस ठाण्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुलभा देशमुख यांनी सहाय्यक फौजदार वसंत वराडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
अलिबाग (रामनाथ) येथे अधिवक्ता श्री. रवींद्र ओक, अधिवक्ता जयंत चेऊलकर आणि अधिवक्ता श्रीराम ठोसर यांना सौ. अनघा मराठे यांनी राखी बांधली.
धुळे
दैनिक ‘आपलं नवराज्य’चे संपादक श्री. सुनील पाटील, दैनिक ‘पथदर्शी’चे संपादक श्री. योगेंद्र जुनागडे, हितचिंतक आणि व्यावसायिक श्री. क्षितीज अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. अनुप अग्रवाल, श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. योगेश भोकरे, जय मल्हार ग्रुपचे श्री. मनोज पिसे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके, जय श्रीकृष्ण मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री भिकनआप्पा वराडे, शिवसेनेचे श्री. शुभम मतकर यांसह अन्य धर्मप्रेमी युवकांना समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी राखी बांधली.
अमरावती
येथे शिवधारा आश्रमाचे पू. डॉ. संतोषकुमार महाराज, ह.भ.प. बाळकृष्ण कराळे महाराज, महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती श्री. विवेक कलोती, नगरसेवक श्री. तुषार भारतीय, शिवसेनेचे माजी खासदार श्री. अनंत गुढे, उद्योजक श्री. विशाल सुरेका यांसह अनेक मान्यवरांना राखी बांधण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रातही रक्षाबंधन उपक्रम साजरा !
पश्चिम महाराष्ट्रातील कराड (सातारा) आणि कोल्हापूर येथे संपादक, पोलीस, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांना राखी बांधण्यात आली. ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची समाजाला आज आवश्यकता आहे’, असे गौरवोद्गार कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या वेळी काढले.