तणावमुक्त जीवनासाठी साधना करणे, हाच उपाय ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
भोपाळ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्व वयोगटांतील व्यक्तींना तणावाचा सामना करावा लागत आहे. हा तणाव दूर कसा करायचा, ही प्रत्येक सर्वसामान्य मनुष्याची मुख्य अडचण आहे. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात तणावग्रस्त रुग्णांवर उपचार करतांना मर्यादा आहेत; परंतु आध्यात्मिक साधना केल्यास मनुष्य तणावमुक्त होऊन आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे तणावमुक्त जीवनासाठी साधना करणे, हाच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.
विदिशा येथील सद्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयामध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना’ या विषयावर सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्रा, रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन चिकित्सालयाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. मिलिंद रावल यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे हेसुद्धा उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. मार्गदर्शनाच्या वेळी ‘प्रोजेक्टर’द्वारे विषय समजावून सांगण्यात आला.
२. या वेळी डॉ. जोबनपुत्रा म्हणाले, ‘‘माझ्या गुरूंनीही मला पुष्कळ वर्षांपूर्वी नामजप करण्यास सांगितला होता. आता सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनीही नामजपच सांगितला आहे. त्यामुळे आता आम्ही मित्र झालो आहोत.’’
३. डॉ. जोबनपुत्रा यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.