यवतमाळ : सार्वजनिक उत्सवातील अनुचित प्रकार रोखून उत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, तसेच उत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्टला श्री केदारेश्वर मंदिर येथील सभागृहात ‘सार्वजनिक उत्सव समिती शिबिर’ पार पडले.
वाघाईमाता मंदिराचे श्री. प्रदीपराव मिरासे आणि श्री. हरिभाऊ चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’, या संदर्भातील ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील अपप्रकारांचे विदारक वास्तव पाहून सर्व सदस्य स्तब्ध झाले. ‘आम्ही आमच्या भागामध्ये अशा प्रकारचे अपप्रकार होऊ देणार नाही’, असा निर्धार या वेळी उपस्थित सर्वांनी केला. या शिबिराला १० गणेशोत्सव मंडळांचे १२ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शन आणि सनातन निर्मित सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता.
प्रतिसाद
१. वाघाईमाता मंदिराचे श्री. हरिभाऊ चौधरी यांनी धर्मविषयक प्रदर्शन मंदिरामध्ये प्रायोजित करण्याची मागणी केली.
२. बाल गणेश उत्सव मंडळाचे श्री. सतीश चव्हाण आणि श्री. मनोज आडे यांनी स्वरक्षण प्रशिक्षण अंतर्गत सेवा देण्याची मागणी केली.
३. सर्वशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचे आकाश पाटणकर यांनी नवरात्रीमध्ये समितीचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्याची मागणी केली.