मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा-महाविद्यालये, वसाहती, मंडळे अशा विविध ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यासाठी बलीदान केलेल्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण, राष्ट्राची सद्यस्थिती आणि आदर्श नागरिक म्हणून आपली कर्तव्ये यांसहित राष्ट्रध्वजाची जाणते-अजाणतेपणी होणारी विटंबना यांविषयी प्रबोधन करण्यात आले. समितीच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मुंबईत १७ ठिकाणी, तसेच नवी मुंबईत २ ठिकाणी समितीच्या वतीने व्याख्याने घेण्यात आली. या वेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांसह एकूण २ सहस्र ८५६ नागरिकांपर्यंत हा विषय पोचला.
सांताक्रूझ येथील कलिना एज्युकेशन सोसायटी या शाळेत ध्वनीक्षेपकाने जोडलेल्या सर्व वर्गांमध्ये १ सहस्र ३०० विद्यार्थ्यांसमोर हा विषय मांडला, तर पराग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात एकाच वेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा ६०० जणांपर्यंत हा विषय पोचला.
विशेष प्रतिसाद
बॅरिस्टर नाथ पै विद्यालय आणि महाविद्यालयात मार्गदर्शनामुळे प्रभावित होऊन ‘मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा आपल्याला निमंत्रित करू’, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील विश्वभारती हायस्कूल येथेही मार्गदर्शनानंतर मुख्याध्यापकांनी ‘शाळेत होणार्या विविध कार्यक्रमांत आपण येऊन मार्गदर्शन करावे’, अशी विनंती केली.
पालघर
विरार येथील विष्णु विहार वेल्फेअर सोसायटी, मां आंबे कृपा सोसायटी, नालासोपारा येथील सोपारा भंडार आळी आणि बोईसर येथे व्याख्यान घेऊन जनजागृती करण्यात आली. सोपारा भंडार आळी येथे कार्यक्रमात राष्ट्रगीतासह संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ शालेय विद्यार्थ्यांसमवेत सर्वांनी म्हटले. तसेच नालासोपारा पूर्व येथील ज्ञानेश्वरनगर येथे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवकांच्या पुढाकाराने लावण्यात आले होते. येथे ५५ नागरिक उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. नालासोपारा येथील प्रदर्शन पाहून नागरिक म्हणाले, ‘‘तुमच्यामुळे आमची मुले चांगल्या गोष्टी शिकत आहेत. तुम्ही प्रती २ मासांनी येथे उपक्रम घेऊ शकता. महिलांसाठीही वेगळा उपक्रम घ्या.’’
२. सोपारा भंडार आळी येथे व्याख्यान चालू असतांना पाऊस येऊनही शेवटपर्यंत सर्व नागरिक थांबले होते. येथे ध्वजारोहण हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्धा येथील ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’
वर्धा : येथील पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सिंधी येथील पोलीस निरीक्षक काळे, हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, राजुरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
वर्धा, सिंधी, राजुरा, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा मिळून एकूण ४३ शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखण्याच्या संदर्भातील निवेदन देण्यात आले आणि ५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. १ सहस्र १४८ विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.
यशोदीप कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या शिल्पा पाध्ये यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अभिप्राय
श्री. मनोज तृपखाने, मुख्याध्यापक, नगरपरिषद कस्तुरबा प्राथमिक शाळा, सिंधी : आपली अत्यंत उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची ठरेल. आपण वेळोवेळी येऊन असेच मार्गदर्शन करावे.
जळगाव येथील ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या चळवळीच्या अंतर्गत यावल, पाचोरा, चोपडा, भुसावळ, वरणगाव, पाळधी, नांद्रा, करंज, भोकर, विदगाव, धामणगाव आदी ठिकाणी समितीच्या कार्यककर्त्यांनी प्रबोधन केले. जिल्ह्यात ५०० हस्तपत्रकांचे वितरण करून आणि ४० ठिकाणी भित्तीपत्रके लावून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे आवाहन करण्यात आले.
जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, यावल येथील पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, भुसावळ येथील पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, चोपडा येथील पोलीस निरीक्षक श्री. लोकरे, पाचोरा येथील ठाणे अंमलदार श्री. पाटील, यावलचे नायब तहसीलदार आर्.बी. माळी, पाचोरा येथील एस्.एस्.एम्.एम्. महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस्.एम्. पाटील, तसेच भुसावळ, चोपडा, नांद्रा येथील पाळधी, किनोद, भोकर, करंज, विदगाव, धामणगाव येथील विविध शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. रणरागिणी शाखेच्या वतीने कन्या माध्यमिक विद्यालय, जामनेर आणि आश्रमशाळा, मनवेल, तसेच चिंचोली येथे क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
संपूर्ण ‘वन्दे मातरम्’
जळगाव येथील फुले व्यापार संकुल, पिंप्री येथील आदर्श प्राथमिक शाळा आणि प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, तसेच पाळधी येथील जिल्हा परिषद शाळा आणि उर्दू शाळेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ घेण्यात आले. तसेच खर्ची येथेही युवकांनी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हटले. चोपडा येथे नगराध्यक्षा सौ. मनीषा चौधरी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ घेण्यात आले.
बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बालिका आदर्श विद्यालय येथे विद्यार्थिनींचे प्रबोधन !
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट दिवशी टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य अंजेश कणगलेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या वेळी इयत्ता १ ली ते १० वीतील ९०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात आधुनिक वैद्य अंजेश यांनी राष्ट्रीय प्रतिकांचे रक्षण कसे करावे, ध्वजसंहिता पालन करण्याचे महत्त्व सांगून राष्ट्रध्वज सन्मान मोहिमेत सहभागी होण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले. सौ. अर्चना लिमये यांनी नागझरी मराठी आणि कन्नड शाळेत इयत्ती १ ली ते ७ मधील २५० विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.