Menu Close

पुणे : ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’तील गणेशभक्तांचा शास्त्रीय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार

पुणे येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर’ पार पडले

डावीकडून सर्वश्री अभिजीत बोराटे, विठ्ठल कामठे, दीपप्रज्वलन करतांना पराग गोखले, हेमंत मणेरीकर

पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध सण-उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करता यावेत, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. याच पार्श्‍वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे संघटन होण्यासाठी समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून गणेशभक्तांमध्ये शास्त्रीय पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी जागृती करण्यात आली. शिबिरात ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून गणेशोत्सवाचे महत्व, तसेच उत्सवात सध्या होत असलेले अपप्रकार यांची माहिती देण्यात आली. सनातन निर्मित ‘श्री गणेश अ‍ॅप’ याविषयीही माहिती देण्यात आली. शिबिरात सर्वांनी २ मिनिटे श्री गणेशाचा नामजप केला. ‘नामजपानंतर अतिशय प्रसन्न वाटले, मन निर्विचार झाले, मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले’, अशा अनुभूतीही सर्वांनी सांगितल्या. शिबिरस्थळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ, तसेच धर्मशिक्षणपर फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा सर्व गणेशभक्तांनी लाभ घेऊन शास्त्रीय पद्धतीने गणेशोत्सव साजरे करण्याचा निर्धार केला.

श्रीकृष्ण मंदिर, तुकाईदर्शन, हडपसर

येथे सर्व गणेशभक्तांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हिंदु युवकांचे संघटन होणे ही काळाची आवश्यकता ! – अभिजीत बोराटे, हिंदवी स्वराज्य युवा संघटना

हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे श्री. अभिजीत बोराटे यांनी ‘गणेशोत्सवाची आजची स्थिती आणि त्यात आवश्यक असलेला मूलभूत पालट’ याविषयी परखडपणे मत मांडले. ते म्हणाले, ‘‘गणेशोत्सव मंडळांच्या समोर निरनिराळ्या ठिकाणी डीजे लावले जातात. तेथे हिडीस नृत्य केले जाते. गणेशोत्सव मंडळांमध्ये होणार्‍या स्पर्धात्मक चढाओढीमध्ये हिंदु विभागला जात आहे; म्हणूनच गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध मंडळांमध्ये एकत्र येणार्‍या हिंदु युवकांचे संघटन होणे ही काळाची आवश्यकता आहे.’’

काही दिवसांपूर्वी आलेले पुराचे संकट पहाता येणार्‍या काळात अशा समस्यांना तोंड देण्यासाठी एकमेकांना साहाय्य करून भगवंताचेही सहाय्य घेणे आवश्यक आहे, याविषयी सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर झालेल्या गटचर्चेत सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी साधना शिबिराची मागणी केली. सर्वांनी उत्स्फूर्तपणे गणेशोत्सवाच्या काळात प्रवचन घेण्याची आणि प्रदर्शन लावण्याची मागणी केली. आपल्या मंडळाच्या अहवालातून गणपतीविषयक धर्मशिक्षणाची माहिती छापण्यास सर्वांनी अनुकूलता दर्शवली.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाच्या मध्यानंतर शिबिरस्थळी दैवी कणांचे प्रमाण वाढले. सर्वांना गारवा आणि चैतन्यही जाणवत होते.

२. केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून निमंत्रण दिलेले मंडळाचे धर्मप्रेमीही शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

भैरवनाथ मंदिर, मारूंजी गाव

मारूंजीगाव येथील शिबिरात उपस्थित गणेशभक्त आणि मंडळांचे कार्यकर्ते

मारूंजी गावातील प्रतिष्ठित श्री. समीर बुचडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराला प्रारंभ झाला. शिबिराचा उद्देश सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अशोक कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळक यांचा सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्याचा व्यापक उद्देश विशद केला.

शिबिरात मार्गदर्शन करतांना समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी ‘गणेशोत्सवातून समाजाला काय आवडते यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे, ते द्यायला हवे’, असे सांगितले.

वर्षातील काही दिवस धर्मकार्य करण्यासाठी दिले पाहिजेत ! – समीर बुचडे, प्रतिष्ठित

श्री. समीर बुचडे यांनी ‘संघटनाअभावी गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्त यांना कशा अडचणी येतात ?’, ते सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपण श्रद्धेमुळे देव किंवा धर्म यांच्या नावाने संघटित होतो. ती श्रद्धा केवळ आपले काम होईपर्यंतच असते. त्यानंतर आपण दुर्लक्ष करतो. वर्षातील काही दिवस तरी आपण धर्माचे कार्य करण्यासाठी दिले पाहिजेत. आजचे शिबिर हा त्याचा प्रारंभ आहे.’’

या वेळी नेरेगाव येथील मूर्तीकार श्री. लक्ष्मण कुंभार यांनी ‘शाडू मातीच्या मूर्ती घेतल्यास शास्त्रानुसार कृती होऊन श्री गणेशतत्त्वाचा लाभ होईल’, असे सांगत सर्वांना शाडू मातीची गणेशमूर्ती घेण्याविषयी आवाहन केले.

धर्मप्रेमींचे साहाय्य

श्री. विठ्ठल कामठे यांनी त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या उत्सवाची माहिती दिली, तसेच ‘उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्येच हवीत’, असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. या शिबिरासाठी श्री. अंकुश जगताप यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. ‘मातोश्री अमृततुल्य’चे श्री. गणेश खळदकर यांनी चहापानाची व्यवस्था केली. धर्मप्रेमी श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचे  शिबिरासाठी विशेष साहाय्य झाले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *