मुंबई : २० ऑगस्ट २०१३ या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर कसे महान समाजसेवक होते’, हे दर्शवण्यासाठी अंनिसवाले जिवाचे रान करत आहेत. त्यांच्या नावे ‘वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ पाळण्याच्या आवाहनापासून ते अगदी त्यांची तुलना म. गांधींशी करण्याचा बालीश प्रयत्नही केला जात आहे. वास्तविक फेब्रुवारी २०१२ मध्ये डॉ. दाभोलकर हयात असतांनाच त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार हिंदु जनजागृती समितीने पुराव्यांसह उघड केले, परिणामी त्याची विविध शासकीय यंत्रणांकडून चौकशीही चालू झाली. ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार पाहिल्यावर साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा कार्यालयातील निरीक्षक आणि अधीक्षक यांनी ट्रस्टचा कारभार पारदर्शक अन् कायद्यानुसार चालत नसल्याचे गंभीर ताशेरे ओढले, तसेच ट्रस्टवर ‘प्रशासक’ नेमण्याची आणि ‘विशेष लेखा परीक्षण’ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही या अहवालाद्वारे केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही हत्येमागे असलेल्या विविध कारणांपैकी आर्थिक व्यवहार हे महत्त्वाचे कारण या प्रकरणी का तपासले गेले नाही ? अंनिसच्या ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार हे डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागील कारण होते का, याचे अन्वेषण का केले गेले नाही ?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठांचा नाहक बळी का दिला जात आहे ?, असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
श्री. घनवट या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणाले की,
१. समाजासमोर विवेक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा बुरखा पांघरणारे अन् अन्वेषण यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी राज्यभर ‘जवाब दो’ची दवंडी पिटणारे अंनिसवाले त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यांविषयी गप्प का आहेत ? ‘डॉ. दाभोलकरांवर ‘श्रद्धा’ ठेवून अंनिसला मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे गेला, याचा ‘जवाब दो’, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
२. पुरोगामी विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांनी अंनिसच्या ट्रस्टला दिलेली त्यांची मालमत्ता, विदेशांतून मिळणारा लाखो रुपयांचा निधी, धर्मादाय आयुक्तांच्या अनुमतीविना अनेक स्थावर मालमत्तांची केलेली खरेदी-विक्री, ट्रस्टच्या पैशांतून पदाधिकार्यांची गाड्यांची खरेदी आदी कोणतीही गोष्ट आर्थिक ताळेबंदात नाही, असे अनेक घोटाळे करून कायद्याचे सर्रास उल्लंघन करूनही अंनिसवाले स्वतःच ‘संविधान बचाव’ आणि ‘विवेकाचा आवाज’ असा ढोल बडवतात, ही अंनिसवाल्यांची ‘वैज्ञानिक भोंदूगिरी’च आहे.
३. डॉ. दाभोलकर हयात असते, तर या प्रकरणांमुळे निश्चित कारागृहात असते आणि ते कारागृहात असते, तर कोण कोण अडचणीत आले असते ? ट्रस्टच्या आर्थिक घोटाळ्यांत कोणाकोणाचे हितसंबंध आहेत ? त्यांचा डॉ. दाभोलकरांच्या हत्येशी संबंध आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी अंनिसच्या ट्रस्टमधील सर्व सदस्य आणि ट्रस्टचे आर्थिक व्यवहार यांची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही श्री. घनवट यांनी या वेळी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात